नाओमीने दुसऱ्यांदा जिंकली अमेरिकन ओपन; अझारेंकाचं स्वप्न पुन्हा अधुरं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावताना 22 वर्षीय नाओमीनं खास कामगिरी केली आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाका हिने दुसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरामगन करत नाओमीने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंका हिला पराभूत केलं. जागतिक क्रमवारी क्रमांक एकवर राहिलेल्या नाओमीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिने 2018 मध्ये अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. 

अमेरिकन ओपनचा अंतिम सामना एक तास 53 मिनिटं चालला. यामध्ये नाओमीने पहिला सेट 1-6 ने गमावला होता. त्यानंतर सलग दोन सेटमध्ये 6-3, 6-3 अशी कामगिरी करत विजय मिळवला.

अझारेंका हिने 26 मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये सहज विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर ओसाकाने सामन्यावर पकड मिळवून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाव नाव कोरलं.

क्रीडा क्षेत्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा sakalsports.com

महिला एकेरीचा अंतिम सामना युएसटीए बिली जिन्स किंग नॅशनल टेनिस सेंटरमध्ये झाला. यामध्ये 22 वर्षीय ओसाकाने पहिल्या सेट मधील पिछाडी पुढच्या दोन्ही सेटमध्ये भरून काढली. अझारेका तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचली पण पुन्हा निराशाच हाती लागली. याआधी ती 2012 आणि 2013 मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तेव्हा दोन्ही वेळा सेरेना विल्यम्सकडून तिला पराभव पत्करावा लागला होता. 

हे वाचा - जोकोविचला अपात्र ठरवणारा 'Default' नियम आहे तरी काय?

26 वर्षात अशी कामगिरी करणारी पहिलीच टेनिस प्लेअर
दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावताना नाओमीनं खास कामगिरी केली आहे. पहिला सेट गमावल्यानंतर विजेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारी गेल्या 26 वर्षातील ती पहिलीच टेनिस प्लेअर ठरली आहे. याआधी 1994 मध्ये स्पेनच्या अरांत्झा सांचेझ विकारियोनं स्टेफी ग्राफविरुद्ध अशी कामगिरी नोंदवली होती. तेव्हा स्टेफीनं पहिला सेट जिंकला होता मात्र त्यानंतर अरांत्झाने बाजी मारली होती. तसंच 1980 पासून पहिल्यांदाच सेमीफायनल आणि अंतिम सामन्याचा निकाल तीन सेटमध्ये लागला आहे.


​ ​

संबंधित बातम्या