इगाची यशोमालिका मारिया साक्कारीने केली खंडित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुटासाठी प्रयत्नशील असलेल्या इगा स्विआतेकला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. स्विआतेक रोलँ गॅरोवरील सलग २२ विजयाची मालिका खंडित करीत मारिया साक्कारी हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पॅरिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुटासाठी प्रयत्नशील असलेल्या इगा स्विआतेकला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. स्विआतेक रोलँ गॅरोवरील सलग २२ विजयाची मालिका खंडित करीत मारिया साक्कारी हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली ग्रीसची पहिली टेनिसपटू होताना मारियाने इगाचा  ६-४, ६-४ असा पाडाव केला. काय बोलावे तेच कळत नाही. स्वप्न प्रत्यक्षात येते म्हणजे काय याचा अनुभव घेत आहे, असे तिने सांगितले. सतरावी मानांकित मारिया आता स्पर्धेतील आव्हान कायम असलेल्यातील सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. तिची उपांत्य फेरीत लढत बार्बरा क्रॅसिकोवा हिच्याविरुद्ध होईल.

बार्बराने अमेरिकेची नवोदित टेनिसपटू कोको गॉफ हिला  ७-६ (८-६), ६-३ असे हरवले. बार्बराने पाच सेट पॉईंट वाचवत सतरा वर्षीय कॉका हिला हरवले. फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळू शकेन असे कधी वाटले नव्हते, असे बार्बरा म्हणाली. बार्बरा, मारिया यांच्याप्रमाणेच अॅनास्तासिया पॅवलीचेंकोवा तसेच तॅमारा झिदान्सेक यांनी पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

चुरशीचा पहिला सेट गमावल्यावर इगाला मांडीच्या दुखापतीने सतावले. या सेटमध्ये तिने दुखऱ्या पायावर दोनदा उपचार करून घेतले होते, पण रोज खेळण्याचा तिला फटका बसला. ही वाटचाल स्वप्नवत असली तरी त्यावर मी नक्कीच समाधान मानणार नाही, असे मारियाने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या