गोल्डन ओल्डी फेडररची पावसाच्या साथीत कूच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

लॉरेंझा सॉनेगाच्या वादळासमोर रॉजर फेडरर कोलमडणार असे वाटत असताना गोल्डन ओल्डीस पावसाची साथ लाभली. त्यानंतर फेडररने तीन सेटमध्येच लढत जिंकत आगेकूच केली. दरम्यान, कॅरोलिना प्लिस्कोवाने प्रथमच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, तर द्वितीय मानांकित दानिल मेदवेदेव पराजित झाला.

लंडन - लॉरेंझा सॉनेगाच्या वादळासमोर रॉजर फेडरर कोलमडणार असे वाटत असताना गोल्डन ओल्डीस पावसाची साथ लाभली. त्यानंतर फेडररने तीन सेटमध्येच लढत जिंकत आगेकूच केली. दरम्यान, कॅरोलिना प्लिस्कोवाने प्रथमच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, तर द्वितीय मानांकित दानिल मेदवेदेव पराजित झाला. 

सेंटर कोर्टवर प्रथमच खेळण्याच्या दडपणातून सावरत सॉनेगाने फेडररला पहिल्या सेटमध्ये ५-५ जेरीस आणले होते. त्या वेळी फेडरर कोलमडत असल्याचे वाटत होते; पण अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोर्ट आच्छादित करून वीस मिनिटांनी लढत सुरू झाल्यावर फेडरर सावरलेला होता, तर सॉनेगाची लय बिघडली होती.  

ब्रेकनंतरच्या पहिल्याच गेममध्ये सॉनेगाने सर्व्हिसची दुहेरी चूक केली. फेडररने त्यानंतर सूत्रे हाती घेत ७-५, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. त्याने ३९ व्या वर्षीही आपण विजेतेपदाचे दावेदार असल्याचेच जणू दाखवले. खुल्या कोर्टवरील आणि बंदिस्त कोर्टमध्ये किती फरक असतो. खुल्या वातावरणात वारे जोरदार वाहत असताना चेंडूवर नियंत्रण अवघड जात होते; पण त्यानंतर चांगले नियंत्रण राखले, असे फेडररने सांगितले. माझे वय बघता अनेकांना मी का खेळतो, असा प्रश्न पडतो. त्यामुळे अनेकदा खूप काही सिद्ध करण्याचे आव्हान असते. अर्थात त्या वेळी शरीर लढण्यासाठी किती साथ देणार, याकडेही लक्ष देण्याची गरज असते, असेही तो म्हणाला. 

प्लिस्कोवाने स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिजा गोलुबिक हिला ६-२, ६-२ असे हरवून आगेकूच केली. सहा फूट एक इंच उंची असलेल्या प्लिस्कोवाने दुसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये सर्व्हिस राखण्यासाठी एक मिनीटही घेतला नव्हता.  
हुबर्ट हुर्काक्झ याने द्वितीय मानांकित दानिल मेदवेदेव याला पराजित करून आगेकूच केली. हुबर्टने ही लढत २-६, ७-६(२), ३-६, ६-३, ६-३ अशी जिंकली. आता तो फेडररविरुद्ध खेळणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या