नाईट कर्फ्यूत नोवाक जोकोविच प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 June 2021

कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी पॅरिसमध्ये रात्रीची संचारबंदी आहे; पण रोलँ गॅरोवर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोवाक जोकोविचचा झंझावात सुरू झाला. दरम्यान, वादळी वातावरणाचा सामना करीत माजी उपविजेत्या मार्केता वोंद्रोसुवा हिने दुसऱ्या फेरीचा अडथळा पार केला.

पॅरिस - कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी पॅरिसमध्ये रात्रीची संचारबंदी आहे; पण रोलँ गॅरोवर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोवाक जोकोविचचा झंझावात सुरू झाला. दरम्यान, वादळी वातावरणाचा सामना करीत माजी उपविजेत्या मार्केता वोंद्रोसुवा हिने दुसऱ्या फेरीचा अडथळा पार केला. 

जोकोविचने फ्रेंच ओपन जिंकण्याची मोहीम सुरू करताना प्रकाशझोतातील लढतीत अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेन याला ६-२, ६-४, ६-२ असे पराजित केले. एकोणिसाव्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी उत्सुक असलेला जोकोविच आपल्या खेळावर पूर्ण समाधानी नव्हता. आपली नाराजी त्याने लपवून ठेवली नाही; पण प्रतिस्पर्धी याचा फायदा घेणार नाही, याची खबरदारी जोकोविचने घेतली. 

प्रकाशझोतातील पुरुष एकेरीची पहिली लढत खेळण्याचा मान मला मिळाला. हा अनुभव नक्कीच वेगळा आहे; पण त्याऐवजी चाहते असताना खेळणे आवडेल. माझ्या आगामी लढती प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतील, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. प्रकाशझोतातील लढतीच्या वेळी पॅरिसमधील रात्रीच्या संचारबंदीमुळे प्रेक्षकांविना होत आहेत. 

सहाव्या मानाकित अलेक्झांडर झ्वेरेवने रशियाच्या रोम साफिउलीन याचा ६-३, ७-६ (७-१) असा पाडाव केला. झ्वेरेवने १५ बिनतोड सर्व्हिस केल्या; पण सर्व्हिसची दुहेरी चूक दहा वेळा घडली, हे त्याला सलत असेल. 

मार्केताने फ्रान्सच्या हार्मोनी तॅन हिला ६-१, ६-३ असे ६२ मिनिटांत हरवले. या लढतीच्या वेळी वादळी वारे वाहत होते. तसेच चाहत्यांनी तॅनला भरपूर प्रोत्साहन दिले; पण मार्केताने त्याचा परिणाम आपल्या खेळावर होऊ दिला नाही. प्रेक्षक माझ्याविरोधात होते, यापेक्षा ते कोर्टवर उपस्थित होते, हे माझ्यासाठी मोलाचे आहे, असे तिने सांगितले.

फ्रेंच स्पर्धेची उपांत्यपू्र्व फेरी खेळण्याचा अनुभव असलेल्या दारिया कॅसात्किना हिने खास मैत्रीण बेलिंडा बेन्सिक हिला ६-२, ६-२ असे पराजित केले. बेन्सिकला स्पर्धेत दहावे मानांकन आहे. 

चारदा सर्व्हिस भेदलेल्या दारियास एकाही ब्रेक पॉईंटला सामोरे जावे लागले नाही.  तॅमारा झिदान्सेक हिने पहिल्यांदाच अव्वल दहामधील खेळाडू बिआंका आंद्रेस्कू हिला हरवल्याचा आनंद साजरा केला. त्या वेळी तिने मॅडिसन ब्रेंगल हिला  ६-४, ६-४ असे पराजित केले.


​ ​

संबंधित बातम्या