तजिंदरपालची 'सोनेरी' गोळाफेक

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

हिमाचा राष्ट्रीय विक्रम 
विश्‍व ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीयांच्या गळ्यातील ताईत झालेल्या हिमा दासने भारतीयांना निराश केले नाही. प्राथमिक फेरीत तिला बहरिनच्या नासेर सल्वापाठोपाठ दुसरे स्थान मिळाले. मात्र 51 सेकंदांत शर्यत पूर्ण करून तिने नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने मंजीत कौरचा 2004 पासून अबाधित असलेला 51.05 सेकंदांचा विक्रम इतिहासजमा केला. भारताची दुसरी स्पर्धक निर्मलानेही प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. 

जाकार्ता : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत भारतीय ऍथलिट्‌सने अपेक्षित सुरवात केली. तजिंदरपाल सिंग तूरने गोळाफेकीत केवळ सुवर्णपदकच मिळविले नाही, तर नवीन स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली. यामुळे भारताचे फेकीतील वर्चस्व कायम ठेवले. हे ऍथलेटिक्‍समधील भारताचे पहिले पदक ठरले. नौदलात कार्यरत असलेल्या तजिंदरच्या सुवर्णमुळे तब्बल सोळा वर्षांनी भारताला अव्वल स्थान मिळविता आले. 
यंदा आशियाई क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या 23 वर्षीय तजिंदरपाल सिंग तूरने पहिल्याच प्रयत्नात 19.96 मीटर अंतरावर गोळा भिरकावला आणि प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला. त्याने चौथ्या प्रयत्नातही सारखीच फेक केली. पाचव्या प्रयत्नात त्याचे सुवर्णपदक निश्‍चित झाले. त्याने तब्बल 20.75 मीटर अंतरावर गोळा फेकला.

फलकावर अंतर झळकताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. हा भारताचा नवीन राष्ट्रीय विक्रमही ठरला. इराणचा मेहरदेलान शाहिन अपयशी ठरल्याने तजिंदरचा मार्ग मोकळा झाला होता. चीनचा लियु यांग याला तजिंदरच्या आसपासही पोचता आले नाही. गेल्यावर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत तजिंदरसिंगला रौप्यपदकावर, तर एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ओमप्रकाश सिंग कऱ्हाना आणि उत्तेजक सेवनात अडकलेला इंदरजित सिंगमुळे तजिंदरसिंगकडे आशेने पाहले जात होते. ही आशा त्याने पूर्ण केली. 

सकाळच्या सत्रात पुरुषांच्या उंच उडीत बी. चेतनला अंतिम फेरी गाठण्यात फारसे श्रम पडले नाहीत. त्याने 2.15 मीटर अंतरावर उडी मारली आणि आपले स्थान निश्‍चित केले. यंदा गिफू येथे ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकणाऱ्या 18 वर्षीय श्रीशंकरने लांब उडीत अंतिम फेरी गाठली. पलक्कडच्या असलेल्या आणि 7.99 अशी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या श्रीशंकरने 7.83 मीटर अंतरावर उडी मारली. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांत तो चौथ्या स्थानावर आहे. महिलांच्या हतोडाफेकीत सरिता सिंगला चीनच्या खेळाडूंचे आव्हान पेलविले नाही. ती पाचव्या स्थानावर (62.03 मीटर) फेकली गेली. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत द्युती चंदने प्राथमिक फेरीत आपली चुणूक दाखविली. तिने वेगवान प्रारंभ करताना अव्वल स्थान (11.38) मिळविले आणि उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत आरोक्‍य राजीवने उपांत्य फेरीत दुसरे आणि महंमद अनसने दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रथम स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. 

अकरा स्पर्धकांत संजीवनी नववी 
महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत नाशिककर संजीवनी जाधवचा उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांत निभाव लागला नाही. यात अकरापैकी नऊ स्पर्धकांनी शर्यत पूर्ण केली. त्यात नाशिकजवळील वडाळी भोई येथील 22 वर्षीय संजीवनी नववी आली. आशियाई स्पर्धेपूर्वी भुतान येथे सरावाला असलेल्या संजावनीने 33 मिनिटे 13.06 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. ही शर्यत अतिशय चुरशीची झाली. अर्ध्या टप्प्यापर्यंत जपानची युको होरी आघाडीवर होती. त्यानंतर बहरीनच्या युनीस चुम्बाने आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत क्रिगिझीस्तानच्या विश्‍व विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या दारिया मासलोवाने बाजी मारली (32 मि. 07.23 सेकंद). चुम्बाला रौप्य, तर चीनच्या देशुन झॅंगला ब्रॉंझपदक मिळाले. गतविजेती संयुक्त अरब अमिरातीची महंमद अलिया चौथी आली. 

हिमाचा राष्ट्रीय विक्रम 
विश्‍व ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीयांच्या गळ्यातील ताईत झालेल्या हिमा दासने भारतीयांना निराश केले नाही. प्राथमिक फेरीत तिला बहरिनच्या नासेर सल्वापाठोपाठ दुसरे स्थान मिळाले. मात्र 51 सेकंदांत शर्यत पूर्ण करून तिने नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने मंजीत कौरचा 2004 पासून अबाधित असलेला 51.05 सेकंदांचा विक्रम इतिहासजमा केला. भारताची दुसरी स्पर्धक निर्मलानेही प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. 

दृष्टिक्षेपात 
- यापूर्वी गोळाफेकीत भारताने 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 ब्रॉंझ पदके जिंकली. 
- यापूर्वीचे सुवर्णपदक 2002 च्या स्पर्धेत बहादूर सिंग सग्गूने जिंकले होते. 
- तजिंदरपाल सिंग तूर पंजाबमधील खोसा पंडो गावचा राहणारा 
- यापूर्वीचा 20.57 मीटरचा स्पर्धा विक्रम 2010 च्या स्पर्धेत सऊदीच्या सुल्तान अल्हाबाशीने केला होता. 
- यापूर्वीचा 20.69 मीटरचा राष्ट्रीय विक्रम ओमप्रकाश सिंगच्या नावावर होता.


​ ​

संबंधित बातम्या