टीम इंडिया 'या' महिन्यानंतर उतरणार मैदानात 

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

भारतीय क्रिकेट संघातील काही ठराविक खेळाडू सोडल्यास उर्वरित संघ अजूनही मैदानापासून दूरच आहे.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट जगत पूर्णतः थांबले होते. त्यानंतर आता कोरोनाची खबरदारी घेत क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने पुन्हा सुरु होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यामध्ये पुढील महिन्यातील 8 जुलै पासून कसोटी मालिकेस सुरवात होणार आहे. या मालिकेनंतर इंग्लंडबरोबर प्रत्येकी तीन कसोटी आणि ट्‌वेन्टी- 20 मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ देखील काल रविवारी इंग्लंडला रवाना झाला. याव्यतिरिक्त अनेक देशांच्या क्रिकेट संघांनी मैदानावर उतरत सरावास प्रारंभ केला आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघातील काही ठराविक खेळाडू सोडल्यास उर्वरित संघ अजूनही मैदानापासून दूरच आहे. आणि आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर सध्या तरी सुरु करणार नसल्याचे म्हटले आहे. 

कोरोनामुळे आता बुद्धिबळ जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित   

भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि रोहित शर्मा या खेळाडूंनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिकरित्या मैदानावर उतरत सरावास सुरवात केली होती. मात्र संघाच्या एकत्र शिबीर सरावास सध्या तरी सुरवात करणार नसल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोलताना सौरव गांगुलीने, ऑगस्ट महिन्याच्या अगोदर भारतीय संघाचे सराव शिबीर घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी अजून एक महिनाभर तरी मैदानावर येता येणार नाही. 

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहेत का ? 

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आयोजनावर अजूनतरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी- 20 विश्वचषक स्पर्धेच्या निश्चितीनंतरच आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न बीसीसीआय करत आहे. तसेच भारतीय संघाचे नियोजित झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौरे सुद्धा रद्द करण्यात आले. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघ मैदानावर येण्यासाठी ऑगस्ट महिन्याची वाट क्रिकेट चाहत्यांना बघावी लागणार आहे.                         

 

 


​ ​

संबंधित बातम्या