आता येणार खरी मजा! स्लो कसोटीमध्ये रोहित आणणार धावांचा स्पीड

शैलेश नागवेकर
Friday, 13 September 2019

 एकाच विश्वककरंडक स्पर्धेत सर्वाधिक पाच शतके अशी विक्रमी कामगिरी करणारा फलंदाज कसोटीत सलामीला खेळला तर निश्चितच संघासाठीही फायदेशीर ठरू शकते त्याची बॅट तळपली की धावांची चांगली गती सुरुवातीपासून मिळू शकते हा विचार नक्कीच झालेला असेल.

फलंदाजीचा क्रम हा सर्वाधिक महत्वाचा समजला जातो.  सलामीवीर असो वा पाचवा, सहावा क्रमांक आपल्या आवडत्या क्रमांकावर फलंदाजी करताना  फलंदाज कंफर्ट झोनमध्ये आल्यासारखा वाटतो. क्रम बदलला की कधीकधी फॉर्मही हरपल्याची आणि पुन्हा मुळ क्रमांकावर फलंदाजी केल्यावर सूर सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण असे काही फलंदाज असतात की ज्यांना क्रमांकाचे देणेघेणे नसते. फलंदाजीच करायचीच ना मग कोणत्या क्रमांकावरही पाठवा. त्यांची बॅट धावांची भाषा बोलायलाच लागते. वीरेंद्र सेहवाग त्यापैकी एक. खर तर तो मधल्या फळीतील फलंदाज या क्रमांकावर त्याने एक शतकही केलेले आहे पण त्यानंतर वीरू म्हणजे सलामीवीर असे समिकरण तयार झाले ते रुढही झाले...तेजतर्रार शोएब अख्तर, ब्रेट ली यांची अनेकदा त्याने भंबेरी उडवलेली आहे.  

वीरूची दोन त्रिशतके
सलामीवीरासाठी खास तंत्र असते ते अचुकही असायला लागते. सुनील गावसकर यापैकी एक. या तंत्रापासून सेहवाग दूर होता पण धावांच्या बाबतीत तो सरस होता. दोन त्रिशतके त्याने सलामीवीर म्हणूनच झळकावलेली आहेत. आता रोहित शर्माला कसोटीतील सेहवाग होण्याची संधी बहुतेक मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलला वगळण्यात आले आणि गेल्या काही दिवसांपासून रोहीतला सलामीला खेळवा या मागणीने जोर धरला. दस्तुरखुद्द सौरव गांगुलीनेही सलामीला रोहितचा पर्याय सुचवलेला होता.

धावांचा वेग वाढेल
रोहित हा सुद्धा मुळतः मधल्या फळीतील फलंदाज पण टीम इंडियात गरज निर्माण झाली आणि तो प्रथम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळू लागला त्यानंतर ट्वेन्टी-20 मध्येही तो सलामीवीर म्हणून रुढ झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावणारा पहिला वहिला फलंदाज,  एकाच विश्वककरंडक स्पर्धेत सर्वाधिक पाच शतके अशी विक्रमी कामगिरी करणारा फलंदाज कसोटीत सलामीला खेळला तर निश्चितच संघासाठीही फायदेशीर ठरू शकते त्याची बॅट तळपली की धावांची चांगली गती सुरुवातीपासून मिळू शकते हा विचार नक्कीच झालेला असेल.

धोनीच्या नेतृत्वातही टीम इंडिया कसोटीत असेच यश मिळवत होता. त्यावेळीही कसोटीत आपला संघ अव्वल स्थानी होता. झहीर आणि कंपनी प्रतिस्पर्धांची फलंदाजी गारद करत होती त्यावेळी सेहवाग सलामीला एवढ्या वेगात धावा करायला की भारताच्या डावाची सरासरी गलेलठ्ठ असयाची आणि झहीर खान कंपनीला प्रतिस्पर्ध्यांचे डोन डाव गुंडाळण्याची पुरेशी संधी मिळायची. रोहितकडूनही आता अशीच अपेक्षा असावी.

झटपट क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट यात मोठा फरक आहे  हे सत्य आहे परदेशात कदाचीत रोहितला कसोटीत सलामीला खेळवण्यात धोका असू शकत पण मायदेशात हा प्रयोग करायला हरकत नाही. हा प्रयत्न यशस्वी झाला तर परदेशातही यश मिळू शकेल.

सचिन आणि शास्त्रींचेही क्रमांक बदलले
लाल चेंडूंच्या क्रिकेटमध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकरही मधल्या फळीतील फलंदाज पण तोही पांढऱ्या रंगाच्या म्हणजेच झटपट क्रिकेटमध्ये सलामीला सर्वात यशस्वी ठरला. एवढेच कशाला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अकराव्या क्रमांकावरून  फलंदाजीची सुरुवात केली, पण तेही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स सलामीवीर ठरले. त्यामुळे रोहितचा कसोटीतील सलामीवीर हा पर्यायही यशस्वी ठरू शकेल.


​ ​

संबंधित बातम्या