आशिया करंडकासाठी विराटला विश्रांती; रोहित कर्णधार

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

पुढील महिन्याच्या मध्यावर आखातामध्ये होत असलेल्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (शनिवार) निवड करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई : पुढील महिन्याच्या मध्यावर आखातामध्ये होत असलेल्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (शनिवार) निवड करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघात अंबाती रायुडू, केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी पुनरागमन केले आहे. तर, राजस्थानचा युवा डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमद या नवा चेहरा संघात सहभागी करण्यात आला आहे. मनीष पांडेला भारत "ब' संघातून खेळताना सूर सापडला आहे. त्यामुळे त्यालाही स्थान देण्यात आले आहे. 

 भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये अडीच महिन्यांपासून खेळत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. पुढील भरगच्च कार्यक्रम आणि ऑस्ट्रेलिया दौरा पाहता निवड समिती हा विचार करण्यात आला आहे. रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा दिली आहे. शिखर धवनकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या आशियाई करंडक स्पर्धेत पाकिस्तानशीही दोन हात करायचे आहेत. 

गेल्या काही एकदिवसीय सामन्यात भारताची मधली फळी कमकुवत ठरलेली आहे. यो यो चाचणीत नापास झालेला रायुडू आता तंदुरुस्त झाला होता. केदार जाधवनेही बंगळूरमध्ये झालेल्या चौरंगी एकदिवसीय स्पर्धेतून तंदुरुस्ती सिद्ध केली होती. तसेच या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारत "ब' संघाचा कर्णधार मनीष पांडेने दोन शतके केलेली होती. या तिघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यष्टीरक्षणासाठी महेंद्रसिंह धोनीसह दिनेश कार्तिकलीही स्थान देण्यात आले आहे. गोलंदाजीत भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्यासह शार्दूल ठाकूर असून, खलील अहमद हा नवा चेहरा संघात असेल.
 
संघ पुढीलप्रमाणे :
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के. एल. राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर, खलील अहमद


​ ​

संबंधित बातम्या