टे टे स्पर्धेत पृथा वर्टीकरला दुहेरी मुकुटाचा मान 

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविताना पृथा वर्टीकरने दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. 

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविताना पृथा वर्टीकरने दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित पृथा वर्टीकरने पाचव्या मानांकित राधिका सकपाळचा 15-13, 11-2, 11-8, 11-8 असा सरळ पराभव करीत विजेतेपद पटकावले. 

या स्पर्धेत पहिल्या गेममध्ये राधिका सकपाळने पृथा वर्टीकरला कडवी लढत दिली; परंतु ही गेम जिंकून पृथा वर्टीकरने आघाडी मिळविल्यानंतर आक्रमक खेळ करीत पुढील तीनही गेम सहजपणे जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत राधिका सकपाळने अव्वल मानांकन असलेल्या अनिहा डिसूझाचा 11-8, 8-11, 12-10, 11-9, 11-5 असा, तर पृथा वर्टीकरने मृण्मयी रायखेलकरचा 7-11, 11-5, 11-4, 14-12, 9-11, 11-8 असा पराभव केला होता. 

या स्पर्धेतील तिचे हे दुसरे विजेतेपद असून, त्याआधी तिने अठरा वर्षांखालील गटात स्वप्नाली नराळेला हरवून विजेतेपद पटकावले होते. राज्य स्पर्धेतही तिने विजेतेपद मिळविले आहे. लक्षचा पाठिंबा लाभलेली विजेती पृथा वर्टीकर शिवाजीनगर येथील पीईएस मॉडर्न इंग्रजी माध्यम प्रशालेत सातव्या इयत्तेत शिकत असून, जिल्हा स्पर्धेतील या मोसमातील तिचे हे तिसरे विजेतेपद आहे. ती रेडीयंट स्पोर्टस अकादमीत रोहित चौधरीच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या