स्वप्नील गुगळेचे शतक ; महाराष्ट्राची दमदार सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 December 2018

पुणे : नाणेफेक जिंकल्यापासून मुंबईच्या चुकलेल्या निर्णयाचा अचूक फायदा उठवत महाराष्ट्राने रणजी करंडक लढतीत दमदार सुरवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 3 बाद 298 धावा केल्या होत्या.

पुणे : नाणेफेक जिंकल्यापासून मुंबईच्या चुकलेल्या निर्णयाचा अचूक फायदा उठवत महाराष्ट्राने रणजी करंडक लढतीत दमदार सुरवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 3 बाद 298 धावा केल्या होत्या.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानाच्या खेळपट्टीने फलंदाजांची साथ कधीच सोडलेली नाही. अशा वेळी नाणेफेक जिंकून मुंबईचा बदली कर्णधार सिद्धेश लाड याने महाराष्ट्राला फलंदाजी देऊन पायावर पहिली कुऱ्हाड मारून घेतली. खेळपट्टीवरील हिरवळ पाहून सिद्धेशने हा निर्णय घेतला; पण तो साफ चुकला. त्यानंतर त्यांचा एकही गोलंदाज महाराष्ट्राच्या फलंदाजीवर अंकुश ठेवू शकला नाही. महाराष्ट्राकडूनच युवा क्रिकेट खेळल्यानंतर चार वर्षांपूर्वी मुंबईकडून खेळणारा शुभम रांजणेने मिळविलेल्या दोन विकेट हीच काय ती मुंबईसाठी जमेची बाजू ठरली.

चिराग खुराना आणि स्वप्नील गुगले या सलामीच्या जोडीने पहिले सत्र सहज खेळून काढले. रॉयस्टन डायस आणि शिवम दुबे यांनी काही षटके चांगली टाकली; पण गुगळे आणि खुराना यांनी त्यांना दाद दिली नाही. उपाहारापर्यंत मुंबईला विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सत्रात मात्र शुभमने खुरानाला बाद करून मुंबईला आवश्‍यक असणारे पहिले यश मिळवून दिले. पण, त्यानंतर खेळायला आलेल्या जय पांडेनेही त्यांच्या गोलंदाजांना त्रस्त केले. दुसऱ्या सत्रातही महाराष्ट्राचेच वर्चस्व राहिले. त्यांनी केवळ एक गडी गमावून 81 धावांची भर घातली.

अखेरच्या सत्रात शुभमनेच पुन्हा एकदा मुंबईला यश मिळवून देताना शतकवीर गुगळेला बाद केले. त्यानंतर नौशाद शेख (23) जयला साथ देऊ शकला नाही. अखेरच्या सत्रात जयला कर्णधार राहुल त्रिपाठीची साथ मिळाली आणि मुंबईच्या गोलंदाजांचा कठीण पेपर सुरूच राहिला. दुसराच सामना खेळणारा जय 68, तर राहुल 25 धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव :87 षटकांत 3 बाद 298 (स्वप्नील गुगळे 101 - 191 चेंडू, 15 चौकार, चिराग खुराना 71 - 106 चेंडू, 12 चौकार, जय पांडे 68 - 142 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, शुभम रांजणे 2-30)


​ ​

संबंधित बातम्या