बुमराने नोबॉल टाळण्यासाठी प्रयत्न करावेत : गावसकर

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

चौथ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त भेदक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांना हादरवून सोडले. ज्यांनी जवळून खेळपट्टी पाहिली त्यांनी मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम असा उल्लेख केला, पण इंग्लंडचे फलंदाज बाद होण्यात हा घटक कोणत्याही प्रकारे कारणीभूत नव्हता.

चौथ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त भेदक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांना हादरवून सोडले. ज्यांनी जवळून खेळपट्टी पाहिली त्यांनी मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम असा उल्लेख केला, पण इंग्लंडचे फलंदाज बाद होण्यात हा घटक कोणत्याही प्रकारे कारणीभूत नव्हता. इंग्लंडचा संघ जाहीर झाला तेव्हा जेनिंग्जच्या स्थानाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याने चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला, पण हाच चेंडू आता आला आणि त्याचा बळी गेला. यावरून त्याचा आत्मविश्‍वास किती खचला आहे हे स्पष्ट होते. कुकचे फुटवर्क आधीच्या कसोटींच्या तुलनेत सकारात्मक होते, पण कसून जम बसविल्यानंतर खराब चेंडूवर त्याने विकेट गमावली. रूट "बॅडपॅच'मधून जात आहे. तो "ऑफ'ला पडणाऱ्या चेंडूंवर बाद होतो आहे. याच कारणामुळे तो तिरकस रेषेत खेळण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला. यापूर्वी बुमराचा नोबॉल पडल्यामुळे तो बचावला होता. बुमराने हे टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. याचे कारण असे होणे वैयक्तिक खेळाडूला निराश करतेच. याशिवाय संघसुद्धा विकेटला मुकतो. वेगवान गोलंदाजाला एक चेंडू जादा टाकावा लागतो. हे दमछाक करणारे ठरते. 

शमीने सुंदर मारा केला आहे, पण त्याला फळ मिळालेले नाही. त्याच्यावर विकेट घेण्याचे दडपण होते. केवळ फलंदाजाला "बीट' करून पुरणार नव्हते. त्याने आधीच्या कसोटीतील शतकवीर बटलर याला बाद करून बहुमोल विकेट मिळविली. त्याच्या आउटस्विंगनंतर विराटने तिसऱ्या स्लिपमध्ये सुरेख झेल घेतला. त्या षटकातील पहिला चेंडू "हाफ व्हॉली' होता. बटलरने तो सीमापार केला होता, पण शमीने मग धूर्तपणे टप्पा आखूड केला. त्यामुळे चेंडू "मूव्ह' होऊ शकला आणि मग बॅटची कड घेऊन गेला. शमीने मग बटलरचा आधीच्या कसोटीत भागीदारीत योगदान दिलेला जोडीदार स्टोक्‍स याला पायचीतच्या सापळ्यात अडकविले. 

मोईन अलीने मागील आठवड्यात कौंटीत द्विशतक आणि सहा विकेट अशी कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची अंतिम संघात निवड झाली होती. करन मागील कसोटीस मुकण्यात दुर्दैवी ठरला होता, कारण स्टोक्‍सला संघातील स्थान पुन्हा मिळाले होते. याच करनने फलंदाजीतील उपयुक्तता दाखवून दिली. मोईन-करन भागीदारीमुळे खेळपट्टीची चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे दिसून झाले. फलंदाजांनी तग धरला तर धावा होतात हे सिद्ध झाले. 

मायदेशातील मोसमाच्यावेळी कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंना प्रथमश्रेणी क्रिकेट खेळू देणे आवश्‍यक असते. त्यामुळे त्यांना स्पर्धात्मक सराव मिळतो आणि ते सज्ज राहतात. भारतीय "थिंक टॅंक'ने हे केले आहे. हे कौतुकास्पद आहे आणि हे कायम राहिले पाहिजे. 
भारतीय गोलंदाजांनी आता सुंदर संधी निर्माण केली आहे. मागील कसोटीप्रमाणे फलंदाजांनी आपले काम चोख पार पाडायला हवे. त्यामुळे भारताला जिंकून मालिकेत बरोबरी साधता येईल. 
 


​ ​

संबंधित बातम्या