परिस्थितीनुसार खेळण्यात फलंदाजांना अपयश : गावसकर

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

दक्षिण आफ्रिकेतील मालिकेप्रमाणे इंग्लंडमध्येही 1-2 पिछाडीवरून मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली. गोलंदाजांनी संधी निर्माण केली होती; परंतु फलंदाजांनी त्यावर पाणी फेरले.

दक्षिण आफ्रिकेतील मालिकेप्रमाणे इंग्लंडमध्येही 1-2 पिछाडीवरून मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली. गोलंदाजांनी संधी निर्माण केली होती; परंतु फलंदाजांनी त्यावर पाणी फेरले. अपवाद मात्र विराट कोहलीच्या दोन्ही डावांतील अनन्यसाधारण फलंदाजीचा. दुसऱ्या ग्रहावरून आल्याप्रमाणे तो फलंदाजी करत आहे. बगीचात फेरफटका मारावा अशा थाटात तो फलंदाजी करत आहे. 
बगीचामध्येही अधून-मधून अडथळे, चढ-उतार असतात. तरीही विराटने 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. क्रिकेट विश्‍वात आपण इतरांपेक्षा किती श्रेष्ठ आहोत, हे विराटच्या फलंदाजीतून सिद्ध होत आहे. 

दुर्दैवाने त्याला इतरांकडून फार चांगली साथ मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणे येथेही विराट बाद झाल्यावर उर्वरित फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहे. चेंडू जरा अधिक प्रमाणात स्विंग होत आहे, हे खरे आहे; परंतु स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सराव होण्यासाठी सराव सामना आपण खेळलो नाही. या जखमेवर मोईन खानने मीठ चोळले. भारतीय फलंदाज उत्तमरीत्या फिरकी गोलंदाजी खेळण्यास वाकबगार समजले जात असताना, त्यांनी मोईनसमोर नांगी टाकली. वळणारे चेंडू खेळण्यासाठी टप्प्यापर्यंत पाय पुढे नेण्याचे तंत्र कोठे गेले, हा प्रश्‍न पडायला लागला आहे. एखादा फलंदाज जास्तीत जास्त नेट प्रॅक्‍टिस करू शकतो; परंतु समोर जागतिक दर्जाचे गोलंदाज नसले तरी मॅच पॅक्‍ट्रिसच सर्वांत चांगला मार्ग असतो. 

वेगवान गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ईशांत शर्मा, महंमद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी जीव तोडून मारा केला. इंग्लिश फलंदाजांना त्यांनी वारंवार कोंडीत पकडले. पाचवा सामना होणाऱ्या ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल, त्यावर आपल्या फलंदाजांना प्रतिष्ठा राखण्याची संधी मिळू शकते; परंतु जर ढगाळ वातावरण असले आणि फलंदाजांच्या बॅटचा वेग चेंडू समोर येईपर्यंत कमी पडला, तर पुन्हा ते अडखळू शकतात. पांढरा चेंडू आणि लाल रंगाच्या चेंडूंचा सामना करताना बॅटच्या वेगात बदल करणे हे प्रामुख्याने परदेश दौऱ्यात महत्त्वाचे असते. 

ओव्हल येथे होणारा सामना ऍलिस्टर कुकचा अखेरचा सामना असेल. इंग्लंडसाठी त्याची कारकीर्द अफलातून राहिलेली आहे आणि इंग्लंडचे हे प्रसिद्ध मैदान पृथ्वी शॉला त्याची कारकीर्द सुरू करणारे ठरू शकते. 


​ ​

संबंधित बातम्या