INDvsBAN : दोन्ही कसोटी सामन्यांची आकडेवारी वेगळी करावी : गावसकर

वृत्तसंस्था
Wednesday, 20 November 2019

कसोटी क्रिकेटमध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याची उशिराने ओळख झाली असली, तरी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मात्र, लाल आणि गुलाबी चेंडूंने होणाऱ्या या कसोटी क्रिकेटची आकडेवारी स्वतंत्र करण्यात यावी असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. 

कोलकता : कसोटी क्रिकेटमध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याची उशिराने ओळख झाली असली, तरी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मात्र, लाल आणि गुलाबी चेंडूंने होणाऱ्या या कसोटी क्रिकेटची आकडेवारी स्वतंत्र करण्यात यावी असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. 

दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या संकल्पनेविषयी बोलताना गावसकर म्हणाले,"अगदी सुरवातीला दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यांना सुरवात झाली, तेव्हा हा प्रयोग यशस्वी होणार नाही असे म्हटले जात होते. पण, चित्र तुमच्यासमोर आहे. त्यामुळे दिवस-रात्र कसोटी सामने लोकप्रिय होणार नाहीत असे म्हणायला जागा नाही.'' 

गुलाबी चेंडूंत खेळल्या जाणाऱ्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यामुळे एक नवे पर्व निर्माण होणार आहे. त्यामुळे गुलाबी आणि लाल चेंडूंने खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांची आकडेवारी देखील स्वतंत्र करावी, असे सांगून गावसकर म्हणाले,"कसोटी क्रिकेटमध्ये या दोन प्रकारे होणाऱ्या सामन्यांची आकडेवारी वेगवेगळी करण्यात यावी, तशीच पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांचीही आकडेवारी वेगळी करण्यात यावी. त्यामुळे पुढील पिढीला या दोन क्रिकेटमधील नेमका फरक समोर येईल.'' 

फलंदाजांची कसोटी लागेल : कोहली 
गुलाबी चेंडूने होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याने देखील आपली मते आज अधिकाराने मांडली. तो म्हणाला,""चेंडूचा रंग बदलल्यामुळे फलंदाजांची कसोटी लागेल. लाल चेंडूूने कसोटी क्रिकेट खेळायची सवय झाल्यावर गुलाबी चेंडू कशा प्रकारे स्विंग होईल किंवा कितपत फिरेल याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे फलंदाजांना सावध रहावे लागेल. त्याचबरोबर गोलंदाजांनाही चेंडू लवकर जुना होणार नसल्यामुळे आव्हान असेल. गुलाबी चेंडू फारसा स्विंग होणार नाही, असा अंदाज आहे.'' 

देशात सर्वप्रथम दिवस-रात्र कसोटी सामना होत असताना तो खेळण्याचा मान आम्हाला मिळतोय याचा आनंद आणि अभिमान वाटतोय. 
-विराट कोहली, भारताचा कर्णधार


​ ​

संबंधित बातम्या