सुनील गावस्कर हे नेट मधील वाईट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक ; वाचा कोण म्हणाले असे    

टीम ई-सकाळ
Sunday, 5 July 2020

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी, नेट मधील सरावा दरम्यान सर्वात वाईट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी सुनील गावस्कर हे एक असल्याचे म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट संघातील 'लिटिल मास्टर' अशी ओळख असलेले फलदांज सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीत धावांचे अनेक विक्रम केले आहेत. क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात अगोदर 10 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. सुनील गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 51.12 च्या सरासरीने 34 शतकांसह 10 हजार 125 धावा केल्या आहेत. त्यामुळे सुनील गावस्कर हे भारतीय व तसेच जगातील क्रिकेट मध्ये एक प्रतिभावान फलंदाज म्हणून नावलौकिक आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी, नेट मधील सरावा दरम्यान सर्वात वाईट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी सुनील गावस्कर हे एक असल्याचे म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान वेब संवादात, सुनील गावस्कर यांना नेट मध्ये फलंदाजीचा सराव करायला बिलकुल आवडत नसल्याचे सांगितले. सुनील गावस्कर यांच्यासोबत जवळपास चार वर्षे भारतीय संघातून क्रिकेट खेळलेल्या किरण मोरे यांनी सुनील गावस्कर यांच्याविषयी बोलताना, कसोटी सामन्याच्या एक दिवस अगोदर नेट मध्ये फलंदाजीचा सराव करताना धडपडत असलेला खेळाडू आणि दुसऱ्या दिवशी सामन्यात मोठी खेळी करत असल्याबद्दल आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. सुनील गावस्कर यांच्याबद्दल सांगताना किरण मोरे यांनी, "सुनील गावस्कर हे सामन्याच्या पूर्वी  नेट मध्ये फलंदाजीचा सराव करताना पाहिल्यास ते उद्याच्या सामन्यात कशा धावा बनवणार असा प्रश्न पडायचा व सामन्याच्या वेळेस मात्र त्यांच्यात पूर्ण बदल होऊन ते उत्तम फलंदाजी करायचे, " असे त्यांनी सांगितले. यासोबतच सुनील गावस्कर यांना जन्मताच एकाग्रतेची अमूल्य देणगी मिळाली असल्याचे किरण मोरे यांनी सांगत, सुनील गावस्कर हे मैदानावर फलंदाजीच्या वेळेस अधिक एकाग्रतेने लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी म्हटले.

ला लिगा :  गेटाफेला नमवत रिअल माद्रिद संघाची विजयी घोडदौड सुरूच 

तसेच स्थानिक क्रिकेट सामन्यातील सुनील गावस्कर यांच्यासोबतची एक आठवण किरण मोरे यांनी या संवादात सांगितली. "सुनील गावस्कर हे शिस्तबद्ध खेळाडू होते. त्यांना शून्य, पाच, दहा अशा लहान धावा केल्यावर बाद झाल्याचे चालायचे, मात्र जर 30 - 40 धावांवर बाद झाल्याचे बिलकुल आवडायचे नाही. एकदा  त्यांच्यासोबत देशांतर्गत क्रिकेट खेळताना वानखेडे येथील एका कसोटी दरम्यान, सुनील गावस्कर हे  30 - 40 धावांवर बाद झाले होते आणि त्यावेळेस ड्रेसिंग रूम मधील इतर खेळाडू लपण्यासाठी इकडे तिकडे पळत होते. लहान खेळींवर बाद झाल्यामुळे सुनील गावस्कर रागाने अस्वस्थ होत आणि आपण आऊट कसे झालो? म्हणून विचार करत," असे किरण मोरे यांनी सांगितले.     

सुनील गावस्कर यांच्या फलंदाजी विषयी बोलताना किरण मोरे यांनी, सुनील गावस्कर हे आतापर्यंतच्या क्रिकेट मधील सर्वात मोठा सलामीवीर आणि सर्वात यशस्वी फलंदाज असल्याचे म्हटले. सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान जोफ थॉमसन आणि डेनिस लिलीसह, जगातील सर्वात भयावह अशा वेस्ट इंडीजच्या जलदगती गोलंदाजी हल्ल्यांविरूद्ध हेल्मेट न घालता फलंदाजी केली असल्याचे किरण मोरे यांनी यावेळेस नमूद केले. आणि त्यामुळेच सुनील गावस्कर हे जगातील उत्तम फलंदाज असल्याचे  किरण मोरे यांनी आवर्जून सांगितले.    

 

 


​ ​

संबंधित बातम्या