त्यांच्याशिवाय लॉर्डसचा विचार कठीणच

सुनंदन लेले
Monday, 13 August 2018

एक वेळ अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी दुसरा सलामीचा फलंदाज किंवा अँडरसनच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज तुम्ही शोधू शकता, पण मायकेल हंटच्या जागी कोणी दुसरा माणूस शोधणे फार कठीण जाणार आहे. तुम्ही म्हणाल या खेळाडूचे नाव आम्ही ऐकलेही नाही. बरोबर, कारण तो खेळाडू नसून तो लॉर्डस मैदानाचा मुख्य माळी आहे.

एक वेळ अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी दुसरा सलामीचा फलंदाज किंवा अँडरसनच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज तुम्ही शोधू शकता, पण मायकेल हंटच्या जागी कोणी दुसरा माणूस शोधणे फार कठीण जाणार आहे. तुम्ही म्हणाल या खेळाडूचे नाव आम्ही ऐकलेही नाही. बरोबर, कारण तो खेळाडू नसून तो लॉर्डस मैदानाचा मुख्य माळी आहे. मग त्याचे इतके कौतुक का? प्रश्न बरोबर आहे. मी जर सांगितले की लॉर्डस मैदानाची आणि खेळपट्टीची मायकेल हंट गेली 49 वर्ष देखरेख करतोय तर तुम्हांला खोटे वाटेल. पण हेच खरे आहे की मायकेल हंट गेली 49 वर्ष लॉर्डसची खेळपट्टी बनवत आला आहे. जगातला सर्वोत्तम क्रिकेट ग्राऊंड्समन म्हणून त्याचा सन्मान झाला आहे आणि आता तो खरच निवृत्त होतोय म्हणून सगळे जरा हळवे झालेत.

‘‘जगभरातून लोक लॉर्डस बघायला इथे येतात. मी गेली 49 वर्ष रोज बघतोय. माझे उलटे आहे मी लॉर्डसच्या चार भिंतीबाहेर जास्त काही बघितलेले नाही कारण मी इथेच काम करतो आणि हे बघ इथेच या आवारात राहतो’’, मायकेल हंट दुसरा कसोटी सामना संपल्यावर भेटले तेव्हा घराकडे बोट दाखवत म्हणाले. 

कामाच्या ताणाबद्दल बोलताना हंट म्हणाले, ‘‘ही अशी जागा आहे जिथे मैदान आणि खेळपट्टी दोनही नेहमी 100% सर्वोत्तमच पाहिजे अशी अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करायला प्रचंड योजनाबद्ध कष्ट करावे लागतात. गंमत अशी आहे की प्रत्येक सामन्यात कोणा गोलंदाजाकडून 5 बळी मिळवायची किंवा फलदांजाकडून प्रत्येक सामन्यात शतक काढायची अपेक्षा नसते, पण आमच्याकडून सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदानाची अपेक्षा कायम असते. अर्थात त्याचा ताण येतो. मला लंडन ऑलिम्पिक्स नंतर प्रचंड ताण आला कारण इथे अर्चरीच्या स्पर्धा झाल्या ज्याने एक तृतियांश मैदानावरील हिरवळ परत लावून वाढवावी लागली ती सुद्धा अवघ्या काही दिवसात कारण लगेच इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना लॉर्डसवर होणार होता’’, आठवण काढताना मायकेलने सांगितले.

भारतीय संघाने दुसर्‍या कसोटी सामन्यात अपेक्षित खेळ केला नाही म्हणून मायकेल हंट जरा नाराज होते. ‘‘मला भारतीय संघ आवडतो. त्यांचे काही कमाल विजय मी अनुभवले आहेत. 1983 साली कपिल देवच्या संघाने विश्वचषक जिंकलेला मी बघितलेला आहे. 2002 साली नॅटवेस्ट स्पर्धेचा अंतिम सामना मी बघितला आहे. भारतीय फलंदाजांना मी एकदम दोष देणार नाही कारण या वेळी शुक्रवारी सामना चालू झाला तेव्हा वातावरण गोलंदाजीकरताच पोषक होते. कोणत्याही संघाची फलंदाजी कोलमडली असती अशीच हवा होती’’.

मायकेल हंटच्या आयुष्यातील सर्वात मजेदार प्रसंग कोणता असे विचारता ते म्हणाले, ‘‘गंमत सांगतो एकदा मी सकाळी मैदानाला पाणी द्यायच्या तयारीने आलो असता मैदानात संपूर्ण पिसारा फुलवेला मोर उभा होता. काय दृष्य होते म्हणून सांगू. पण आता माझे काम संपले आहे. मी आता आराम करू शकतो. मला ते जमेलच असे नाही सांगता येत. अविरत 49 वर्ष या ऐतिहासिक मैदानाची सेवा केल्यावर माझी दुसरी इनिंग चालू होत आहे. पत्नीला मी शब्द दिला आहे की आज वेळेवर रात्रीच्या जेवणाला येणार म्हणून जातो आता’’, जाता जाता डोळे मिचकावत मायकेल हंट म्हणाले.

संबंधित बातम्या