आता वरिष्ठ फलंदाजांना पाठीशी घालणे अशक्य

सुनंदन लेले
Tuesday, 4 September 2018

लंडन : चार कसोटी सामन्यातील एका सामन्याचा अपवाद वगळता भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघाशी दोन हात करायचे प्रयत्न केले. एका प्रयत्नात यश मिळाले तर दोन वेळा यशाने भारतीय संघाला चांगलाच गुंगारा दिला. परंतु सगळ्याचे अपयशाचे कारण एकच राहिले आहे ते म्हणजे गोलंदाजांना फलंदाजांची साथ नाही.

लंडन : चार कसोटी सामन्यातील एका सामन्याचा अपवाद वगळता भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघाशी दोन हात करायचे प्रयत्न केले. एका प्रयत्नात यश मिळाले तर दोन वेळा यशाने भारतीय संघाला चांगलाच गुंगारा दिला. परंतु सगळ्याचे अपयशाचे कारण एकच राहिले आहे ते म्हणजे गोलंदाजांना फलंदाजांची साथ नाही.

चार सामन्यातील गोलंदाजांच्या कामगिरीची स्तुती होत असताना फलंदाजांवर टीकेचा रोख राहिला आहे. भारतीय फलंदाजांवर होणारी टिका रास्त आहे. चार सामन्यातील आठ डावात विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने सलग दोन डावात चांगली खेळी केलेली नाही. पुजारा आणि रहाणेने प्रत्येक दोन वेळा चांगला खेळ केला पण तो एका कसोटीत नव्हता. चांगल्या खेळीनंतर खराब खेळी असाच प्रवास त्या दोघांचा झाला. दुसर्‍या बाजूला लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि विकेट किपर म्हणून खेळलेले दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत हे खेळाडू फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत. 

जी भारताची परिस्थिती आहे तीच इंग्लंड फलंदाजीची आहे. ज्यो रुटने अपयशी फलंदाजांची बाजू मांडताना सांगितले, ‘‘दोनही बाजूला जे वेगवान गोलंदाज आहेत ते फारच सुंदर भेदक मारा करत आले आहेत. त्यातून इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजांना यावेळी खूप साथ देत आहे. वरच्या क्रमांकावर खेळणार्‍या फलदांजांना अपयश येण्याचे हेच कारण आहे.’’

सलग 7 डावात अपयशी ठरलेल्या अ‍ॅलिस्टर कुकने शेवटच्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याने ज्यो रुटला विचारला जाणारा, ‘अपयशी ठरणार्‍या अ‍ॅलिस्टर कुकचे काय करणार’, हा प्रश्न आता थांबणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन फलंदाजीतील अपयशाबद्दल उघड बोलत नसले तरी आत त्यावरून बोलाचाली चालू आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीने संघातील प्रमुख फलंदाजांना जबाबदारी स्वीकारून खेळायचे आवाहन केले आहे. विराट कोहली हा एकच खेळाडू असा आहे ज्याने चारही सामन्यात आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला आहे.

पाचव्या सामन्यात भारतीय फलंदाजांना दोन्ही डावात चांगली कामगिरी करून दाखवायचे आव्हान असेल. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन अपयशी फलंदाजांना जास्त काळ पाठीशी घालू शकणार नाहीत. प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमधे आणि भारतीय ‘अ’ संघातून सातत्याने मोठ्या धावा करणार्‍या गुणवान खेळाडूंना मुख्य भारतीय संघापासून जास्तकाळ लांब ठेवणे कठीण जाणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या