भारतीय संघाने मानसिकतेत बदल करावा; सचिनचा सल्ला

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डसवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारताचा सलामीवीर सचिन तेंडुलकरने भारतीय खेळाडूंना तंत्रापेक्षा मानसिकतेत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डसवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारताचा सलामीवीर सचिन तेंडुलकरने भारतीय खेळाडूंना तंत्रापेक्षा मानसिकतेत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. 

इतके दिवस दौर्‍यावर गेल्यावर समोरच्या संघाला कडवी टक्कर देणार्‍या भारतीय संघाचे जहाज अचानक कसे भरकटले? फलंदाजी हेच भारतीय संघाचा बलस्थान असताना फलंदाजांना धावा करणे तर सोडा, साधे खेळपट्टीवर टिच्चून उभे राहणे दुरापास्त का व्हायला लागले? स्वींग गोलंदाजी खेळताना भारतीय फलंदाजांची त्रेधा का उडत आहे? इंग्लिश गोलंदाजांना त्यांच्या मैदानावर खेळणे खरच इतके कठीण आहे का? तंत्रातील त्रुटी दूर करायला काय करायला पाहिजे? असे अनेक प्रश्न सर्व चाहत्यांना पडले आहेत. 

याच प्रश्नावर बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला, ''भारतीय फलंदाजांच्या तंत्रात खूप मोठ्या चुका आहेत असे मला वाटत नाही. शॉट सिलेक्शन म्हणजेच कोणत्या चेंडूवर आक्रमक फटका मारायला पाहिजे याची निवड चुकते आहे तीच मोठी समस्या आहे. माझ्यामते तंत्रापेक्षा मानसिकतेत बदल करणे जास्त गरजेचे आहे. मान्य आहे की कधीकधी इंग्लंडमधे चेंडू इतका स्वींग होतो की खेळणे मुश्कील होते. अशा वेळी कसेही करून खेळपट्टीवर उभे राहणे महत्त्वाचे ठरते. 

मला 2007 साली नॉटींगहम कसोटीत रायन साईडबॉटमचा स्पेल आठवतो. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा साईडबॉटम ओव्हर दी विकेट एकाच टप्प्यावर गोलंदाजी करताना सगळे चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकून कधी स्वींग करून बाहेर नेत होता तर कधी आत आणत होता. मी संपूर्ण एक तास फक्त बचाव करत होतो. त्याचे नियंत्रण खूप चांगले होते. त्या एका तासात निम्मे चेंडू योग्य अंदाज घेत सोडले. जेमतेम 8 धावा मी आणि सौरवने त्या एका तासत जमा केल्या असतील, पण आम्ही विकेट जाऊन दिली नाही. साईड बॉटम थकून थांबल्यावर मग आमची नजर बसली असताना फटके मारायला लागलो. 

मला इतकेच या उदाहरणातून सांगायचे आहे की इंग्लंडमधे कसोटी सामन्यात पोषक वातावरणात गोलंदाज चांगला मारा करताना त्याच्यावर वर्चस्व गाजवायचा विचार दूर ठेवायला लागतो. पहिले 35-40 षटके गोलंदाजांना मान दिला संयम ठेवला तर नंतर नक्की मोठ्या धावा करता येतात. भारतीय फलंदाजांना तेच करावे लागेल. 

याविषयी दिलीप वेंगसरकर म्हणाले, ''लॉर्डस मैदानावर मला तीन शतके ठोकता आली याचा अभिमान वाटतो. मी खेळत असताना इंग्लंड संघात वेगवान गोलंदाजही होते आणि स्वींगवर हुकूमत असणारे गोलंदाजही होते. मला वाटते की इंग्लंडमधे फलंदाजी करताना भारतात फलंदाजी करताना लागलेल्या सवयी मागे ठेवून मैदानात उतरावे लागते. स्टंपात पडलेल्या चेंडूला भारतात मनगटांचा वापर करून वळवता येते. इंग्लंडमधे ती सवय घातक ठरते कारण इथे चेंडू उशिराने स्वींग होतो. मुरली विजयने लॉर्डस कसोटी सामन्यात केलेली चूक त्या स्वरूपाची होती. पहिल्या 25 धावा जमा करताना तुमचा कस लागतो त्याकरता संयम ठेवावा लागतो.'' 

संबंधित बातम्या