इंग्लंडमधील ड्युकस चेंडूवर गोलंदाज खूश

सुनंदन लेले
Friday, 24 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका रंगायला गोलंदाजांची चांगली कामगिरी कारणभूत ठरली आहे. गोलंदाज जितके स्वत:च्या गोलंदाजीवर खूश आहेत तितकेच ते मालिकेदरम्यान वापरल्या जाणार्‍या ड्युकस चेंडूवर खूश आहेत.

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका रंगायला गोलंदाजांची चांगली कामगिरी कारणभूत ठरली आहे. गोलंदाज जितके स्वत:च्या गोलंदाजीवर खूश आहेत तितकेच ते मालिकेदरम्यान वापरल्या जाणार्‍या ड्युकस चेंडूवर खूश आहेत.

''आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे तीन चेंडू वापरले जातात. एक आहे भारतातील एसजी टेस्ट बॉल, दुसरा आहे ऑस्ट्रेलियातील कुकाबुरा बॉल आणि तिसरा आहे इंग्लंडमधील ड्युकस बॉल. माझ्या मते ड्युकस बॉल सर्वात चांगला आहे कारण तो वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना समान साथ देतो. याची शिवण बोटांना मस्त जाणवते ज्याने पकड करायला खूप चांगले वाटते ज्याला आम्ही फिरकी गोलंदाज कात्री म्हणतो. हे मान्य आहे की घट्ट कात्रीत पकडला नाही तर ड्युकस बॉल फिरकी गोलंदाजांच्या बोटातून कधीकधी निसटू शकतो'', अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या चेंडूंबद्दल माहिती देताना सांगत होता. 

ड्युकस बॉल बद्दलची उत्सुकता वाढली होती आणि त्यातून त्याची फॅक्टरी लंडनला असल्याचे समजले होते मग त्या फॅक्टरीला भेट देणे अपरिहार्य ठरले. वॉल्थेप्टनस्टोव्ह भागात ड्युकस बॉल बनवण्याची फॅक्टरी आहे आणि त्याचे मालक अनिवासी भारतीय दिलीप जजोडिया आहेत. फॅक्टरीला भेट दिल्यावर दिलीप जजोडियांनी ड्युकस चेंडू बनवण्याची बरीच गुपिते खुली केली. 

‘‘तीन पैकी दोन म्हणजे ड्युकस आणि एसजी टेस्ट चेंडू हाताने शिवलेले असतात. कुकाबुरा चेंडू मशीनवर शिवला जातो. ड्युकस चेंडूकरता आम्ही अत्यंत उच्च दर्जाचे कातडे वापरतो आणि त्याला अ‍ॅलम टॅन्ड प्रक्रियेने कमावतो. अ‍ॅलम टॅन्ड प्रक्रिया म्हणजे चक्क तुरटीचा वापर करून कातडे कमावले जाते. या कातड्यावर आम्ही अगदी थोडे मेण लावतो कारण इंग्लंडमधे गवतावर पाणी असते ते जर चेंडूत घुसले तर कातडे खराब होते. बाकी कातडे कमावताना एखाद्या सर्वोच्च प्रतीच्या बुटांकरता केली जाते तीच प्रक्रिया अवलंबली जाते. याचा फायदा असा होतो की जितका चेंडू तुम्ही घासाल तितकी त्याची चकाकी टिकू शकते'', दिलीप जजोडिया सांगत होते. 

ड्युकस चेंडूची आतली गोळी तयार करायला पोर्तुगालहून बुचाचे पट्टे आणि मलेशियातून रबर आयात केले जाते. त्याचे योग्य मिश्रण करून गोळी मशीनवर बनवली जाते. मग त्याच्यावर चार समान आकाराच्या कातड्याचे तुकडे एकत्र करून शिवले जातात. ही सर्व प्रक्रिया भारतात केली होते हे जजोडियांनी सांगितले नाही तरी त्याची पूर्वकल्पना मला होती. 

ड्युकस चेंडूचा वापर करून इंग्लंड आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांनी समोरच्या फलंदाजांना सतत प्रश्न विचारले आहेत, अडचणीत टाकले आहे. ''कितीही षटके टाकून झाली तरीही ड्युकस चेंडू स्वींग केला जाऊ शकतो हा विश्वास आम्हांला वाटतो आहे म्हणून आमचा आत्मविश्वास दुणावला आहे'', भारतीय गोलंदाजांचा नेता ईशांत शर्मा शेवटी कौतुक करताना म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या