कुकने शिजवली शतकाची खिचडी

सुनंदन लेले
Monday, 10 September 2018

लंडन : त्याने क्रिकेटची सेवा केली आणि क्रिकेट देवाने त्याला भरभरून दिले. संपूर्ण मालिकेत त्याला धावा करताना झगडावे लागले. त्याने प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्तीची नुसती घोषणा केली आणि सगळे चित्र बदलले. होय अ‍ॅलिस्टर कुकने पदार्पणाच्या सामन्यात शतक केले होते आणि कारकिर्दीच्या शेवटच्या डावातही त्याच्या नावासमोर शतक लागले. ओव्हल मैदानावर कुकने शतकाची खिचडी शिजवली तेव्हा प्रेक्षकांनी त्याला पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत मानवंदना दिली.

160 कसोटी सामने खेळलेल्या अ‍ॅलिस्टर कुकच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नसल्याने चर्चेला उधाण आले होते. प्रत्येक कसोटी सामन्यानंतर ज्यो रुटला स्थानिक पत्रकार कुकचे काय करणार हा प्रश्न विचारत होते. चौथ्या सामन्यानंतर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकायचा निर्णय जाहीर केला. शेवटच्या कसोटी सामन्यात अ‍ॅलिस्टर कुक फलंदाजीला उतरला तेव्हा भारतीय संघाने पंचांसह त्याला गार्ड ऑफ ऑनरची मानवंदना दिली. सामन्याच्या चौथ्या दिवशी क्रिकेटने त्याला भरभरून प्रेम दिले. कारकिर्दीतील 33वे शतक साजरे केल्यावर ज्यो रुटने हातातील बॅट काली ठेवून टाळ्या वाजवल्या आणि कुकला कडकडून मिठी मारली. प्रेक्षकांनी टाळ्या वाजणे पाच मिनिटे थांबवले नाही शेवटी कुकला हात आणि बॅट वर करून परत प्रेक्षकांना अभिवादन करावे लागले. 

संपूर्ण कारकिर्दीत अ‍ॅलिस्टर कुक क्रिकेटची परंपरा सांभाळून खेळला. त्याला संघातील नव्हे तर प्रतिस्पर्धी संघाचाही मान मिळाला. कधीही गैरकृत्य, गैरवर्तन तर सोडाच गैरवक्तव्य अ‍ॅलिस्टर कुकने केले नाही. इंग्लंड संघावर त्याच्या शांत सभ्यतेचा पगडा होता. एक प्रकारची दहशत त्याच्या सभ्यतेची होती. कोणत्याही परिस्थितीत अ‍ॅलिस्टर कुकने आपला संयम मैदानावर किंवा मैदानाबाहेर गमावला नाही. 

ओव्हल मैदानावर कुकने अनेक विक्रम मागे टाकले. सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या यादीत कुकने मानाचे पाचवे स्थान पटकावले. पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक करणारा तो अनोखा खेळाडू ठरला. बारा हजार धावांबरोबर क्रिकेटची संस्कृती मनापासून जपल्याबद्दल क्रिकेट जगत अ‍ॅलिस्टर कुकला लक्षात ठेवणार आहे.

​ ​

संबंधित बातम्या