कसोटी सामन्यांमध्ये होणारे हे नुकसान लक्षात कोण घेतो?

सुनंदन लेले
Sunday, 17 November 2019

तीन -चार संघ सोडले तर कसोटी क्रिकेट खेळणार्‍या संघांच्यात दम उरलेला नाही. एकीकडे आयसीसी कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्याची भाषा करत आहे, तर दुसरीकडे कसोटी सामने नुकतेच एकतर्फी नव्हे, तर तीन दिवसांत संपत आहेत.

इंदूर : भारतात क्रिकेट एक खूप मोठा व्यवसाय झाला आहे आणि शेकडो नव्हे, तर हजारो लोकांना त्यातून रोजगार मिळतो. सामना खेळणार्‍या विराट कोहली पासून ते स्टेडियममध्ये वडापाव विकणार्‍या माणसापर्यंत सगळ्यांना यातून आमदनी होत असते.

मर्यादित षटकांचा सामना असतो, तेव्हा मामला फक्त त्या दिवसाचा असतो. कसोटी सामन्याच्यावेळी सगळा हिशोब 5 दिवसांचा केला जातो. जेव्हा 5 दिवसांचा कसोटी सामना तीन दिवसात संपतो, तेव्हा कोणाचे कसे नुकसान होते, याचा विचार कोणी करते का नाही हा प्रश्न इंदूर कसोटी सामन्यानंतर मनात रेंगाळत राहतो.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नेहमी प्रयत्नात असते की, भारतीय संघ जास्तीत जास्त सामने खेळेल. बीसीसीआयने स्टार स्पोर्टस् बरोबर करार केला आहे, ज्यात भारतीय संघ मायदेशात कमीतकमी किती सामने खेळेल, याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. साहजिकच बीसीसीआय आखणी करून संघ कसे भरपूर सामने खेळेल याकडे जातीने लक्ष घालते, ज्यात काहीच गैर वाटत नाही. समस्या ही आहे की, गेल्या काही वर्षात पाहुण्या संघाला भारतात येऊन भारतीय संघाला हरवणे तर सोडाच, पण लढत देणेही अभावाने जमलेले आहे. बरेच कसोटी सामने 5वा दिवस बघत नाहीत ज्याने बर्‍याच लोकांचे अपरिमित नुकसान होत आहे.

- हृदयस्पर्शी गुडबाय! सचिनसह त्याच्या चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला

उदाहरण द्यायचे झाले, तर भारतीय संघाच्या शर्टवर लावायच्या लोगोच्या हक्काचे देता येईल. अगोदर चीनची मोबाईल कंपनी ‘ओपो’कडे हे हक्कं होते. नुकतेच हे हक्कं त्यांनी देऊन टाकले आणि स्पष्ट कारण सांगितले की, इतकी प्रचंड मोठी रक्कम देणे शक्य होत नाहीये. मग भारतातील ‘बायजुज् लर्निंग अ‍ॅप’ कंपनी मोठे धाडस करून हे हक्कं घेतले. आपल्याला कल्पना यावी म्हणून आकडा सांगतो प्रत्येक सामन्याला साडे चार कोटी रुपये बायजुज् कंपनीला बीसीसीआयला द्यावे लागतात. म्हणजेच ते विचार करत असणार की कसोटी सामन्याच्या प्रत्येक दिवशी आमची योग्य जाहिरात दिसेल आणि दर दिवशीचा खर्च 90 लाख रुपये येईल, पण जर सामना तीन दिवसात संपला, तर हाच प्रत्येक दिवशीचा खर्च वाढून 1.5 कोटी रुपये होतो.

- बॅडमिंटनवरून लक्ष दूर झाल्याचे म्हणणे चुकीचे! - सिंधू

त्यापेक्षा मोठी अडचण प्रक्षेपणाचे हक्कं विकत घेणार्‍या स्टार स्पोर्टचे होत असणार. कारण स्टार स्पोर्टस् कंपनीने केलेल्या कराराचा विचार केला, तर प्रत्येक सामन्याला प्रक्षेपणाकरता 60 कोटी रुपये देत आहेत. म्हणजेच 12 कोटी रुपये कसोटी सामन्याच्या प्रत्येक दिवसाकरता स्टार मोजत असेल, तर हाच खर्च तीन दिवसात सामना संपला तर 20 कोटीवर जातो. बीसीसीआयला करार केला गेला असल्याने काही नुकसान होत नाही. कारण सामना कितीही लवकर संपला तरी करारानुसार पैसे दिले जातात. समस्या पैसे घेणार्‍यांची नव्हे, तर देणार्‍यांची होत आहे. तीच गोष्ट सामन्यादरम्यान मैदानात केल्या जाणार्‍या जाहिरातीचे हक्कं विकत घेणार्‍यांची आहे. सगळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.

- IPL 2020 : कोणत्या संघाने वगळले कोणते खेळाडू? पाहा पूर्ण यादी

तीन -चार संघ सोडले तर कसोटी क्रिकेट खेळणार्‍या संघांच्यात दम उरलेला नाही. एकीकडे आयसीसी कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्याची भाषा करत आहे, तर दुसरीकडे कसोटी सामने नुकतेच एकतर्फी नव्हे, तर तीन दिवसांत संपत आहेत. ज्या अर्थकारणावर बीसीसीआय संपूर्णपणे स्वावलंबी असण्याची मिजास करत आहे त्याच्या पायाला या प्रकाराने धक्का बसतो आहे आणि नुकसान बीसीसीआयचे नाही, तर भारतीय क्रिकेटमधे पैसे गुंतवणार्‍या लोकांचे होत आहे.

जर बीसीसीआयने स्वार्थ बाजूला ठेवून या समस्येवर विचार केला नाही, तर नजीकच्या भविष्यात मोठे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. कारण आर्थिक मंदी सर्वदूर पसरली आहे.


​ ​

संबंधित बातम्या