फलंदाजीतील धमाकेदार खेळीनंतर स्टुअर्ट ब्रॉडची गोलंदाजीतही कमाल 

टीम ई-सकाळ
Sunday, 26 July 2020

पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे.

इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात 369 धावा केल्यानंतर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. इंग्लंडच्या फलंदाजीनंतर मैदानावर उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे 197 धावांवर रोखण्यात इंग्लंडला यश आले. त्यामुळे पहिल्याच डावात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 172 धावांची आघाडी मिळवली आहे.      

आता 'या' देशांचे खेळाडूही आयपीएलच्या सुरुवातीस मुकणार? 

तिसऱ्या कसोटी सामन्यात सुरवातीला पहिल्या डावात फलंदाजी करताना, इंग्लंडने सलामीवीर रोरी बर्न्स, ओली पोप, जोस बटलर व स्टुअर्ट ब्रॉडच्या धमाकेदार खेळीमुळे 369 धावा उभारल्या. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडने फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या क्रॅग ब्रेथवेटला अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले. जॉन कॅम्पेबलने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला. पण जोफ्रा आर्चरने बर्न्सकरवी त्याला झेल बाद करत इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर शाय होप 17,  ब्रुक्स 4 यांना जेम्स अँडरसनने स्वस्तात माघारी पाठवले. तर ब्लॅकवूडची 26 वोक्स ने विकेट घेतल्यामुळे विंडीजचा संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 6 गड्याच्या मोबदल्यात 137 धावांच्या पुढे खेळताना रोस्टन चेस 9, जेसन होल्डर 46, कॉर्नवेल 10 यांना पायचीत व डाउरिचला 37 वोक्सकडे झेलबाद करत स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्याच डावात 6 विकेट मिळवल्या. स्टुअर्ट ब्रॉडचा या धमाकेदार कामगिरीमुळे पहिल्याच डावात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 172 धावांची आघाडी घेतली असून, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने बिनबाद 94 धावा केल्या आहेत.                    

त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीमध्ये या सामन्यात अफलातून खेळाचे प्रदर्शन केले आहे. पहिल्या डावात त्याने 62 धावांची खेळी करत वेगवान अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर पहिल्याच डावात उत्तम गोलंदाजी करत 6 विकेट मिळवत, वेस्ट इंडिजला 197 धावांवर रोखले. त्यामुळे या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे.    

श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूकडून सौरव गांगुलीचे तोंडभर कौतूक

दरम्यान, कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने तर मँचेस्टर येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे दोन्हीही संघ मालिका काबीज करण्याच्या हेतूने मैदानात उतरल्या असून, यापैकी वरचढ कोण ठरणार हे पाहणे रंजक असणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या