'तिला' न्याय मिळावा, म्हणून जोरदार प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 May 2019

पुणे : केवळ मित्रासोबत चहा घेतल्याच्या कारणावरून म्हाळुंगे-बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील क्रीडा प्रबोधिनीतून हकालपट्टी झालेल्या हॉकीपटू मुलीला न्याय मिळावा, म्हणून महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सरचिटणीस मनोज भोरे मंगळवारी नवे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना भेटणार आहेत. 

पुणे : केवळ मित्रासोबत चहा घेतल्याच्या कारणावरून म्हाळुंगे-बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील क्रीडा प्रबोधिनीतून हकालपट्टी झालेल्या हॉकीपटू मुलीला न्याय मिळावा, म्हणून महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सरचिटणीस मनोज भोरे मंगळवारी नवे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना भेटणार आहेत. 

मुलीवरील अन्यायाची बातमी रविवारी "सकाळ'ने प्रसिद्ध केल्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भोरे यांनी सांगितले की, आतापर्यंत प्रथमच महाराष्ट्रातील तीन मुलींची एकाचवेळी शिबिरासाठी निवड झाली होती. "इंडिया कोअर' म्हणजे देशाच्या संभाव्य संघात स्थान मिळणे ही पहिली पायरी असते. तेथपर्यंत मजल मारलेल्या मुलींचा प्रबोधिनीने समारंभपूर्वक सत्कार करायला हवा, पण तसे न होता त्यातील एकीला क्षुल्लक कारणावरून खड्यासारखे बाजूला करण्यात आले, जे धक्कादायक आहे. 

भोरे यांनी सांगितले की, बकोरिया साहेब पूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर होते. त्यांच्याकडे काही काळ क्रीडा आयुक्तपदाची सूत्रे होती. ते महाविद्यालयीन पातळीवर हॉकी खेळले आहेत. ऑलिंपियन अजित लाक्रा यांची ओळख करून दिली असता, त्यांनी अत्यंत अदबीने त्यांची विचारपूस केली होती. पुण्यात एक ऑलिंपियन खेळाडू घडवीत असल्याबद्दल त्यांनी विलक्षण समाधान व्यक्त केले होते. 

'मला पण मुलगी आहे...' 
भोरे यांनी या मुलीवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले. याविषयी ते म्हणाले की, मी क्रीडा मार्गदर्शक सुहास पाटील यांना भेटलो. मुळात ही मुलगी असे काही करणारी नाही, त्यातही तिने काही चूक केलीच असेल, तर आम्ही तिला समजावून सांगू, पण तिला काढू नका, अशी कळकळीची विनंती केली. मलासुद्धा मुलगी आहे, तिने असे काही केले तर मी तिला घरातून हाकलून देणार नाही, समजावून सांगेन, असे उदाहरणसुद्धा मी देऊन पाहिले. यानंतरही सुहास पाटील यांचा निर्णय बदलला नाही. 

उदयनराजे यांची भेट 
ही मुलगी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे सागर करंडे, सादिक बागवान यांच्यासह साताऱ्यातील काही खेळाडूंनी खासदार उदयनराजे भोसले यांची सोमवारी भेट घेतली. ग्रामीण भागातील मुलींमध्ये उपजत गुणवत्ता, जिद्द असते. त्यास पैलू पाडावे लागतात. त्या मुलीचे हॉकी कौशल्य वादातीत आहे. तिची आतापर्यंतची वाटचाल प्रेरणादायक आहे. ती आणखी मजल मारू शकते. अशावेळी तिला न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली.

संबंधित बातम्या