World Cup 2019 : स्मिथ, वॉर्नर परतले; ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

वृत्तसंस्था
Monday, 15 April 2019

संघ पुढीलप्रमाणे : ऍरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथन कुल्टर नाईल, जेसन बेहरनडॉफ, नॅथन लायन आणि ऍडम झम्पा.

मेलबर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेले स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली आहे. तर, कर्णधारपद हे ऍरॉन फिंचकडे असेल हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे सध्या आयपीएलमध्ये खेळत असून, या दोघांचाही फॉर्म चांगला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोघांच्याही कामगिरीच्या आधारावर त्यांची विश्वकरंडकासाठी संघात निवड केली आहे. वॉर्नर आणि फिंचही सलामीची जोडी जवळपास निश्चित आहे.  उस्मान ख्वाजा हा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात या दोघांवरील बंदीची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांचा विश्वकरंडकासाठी संघात समावेश हा निश्चित मानण्यात येत होता. मात्र, कर्णधारपद पुन्हा स्मिथकडे देण्यात येईल, याची शक्यता नव्हती. अखेर झालेही तसेच. स्मिथकडे कर्णधारपद न देता फिंचकडे नेतृत्व कायम ठेवले आहे.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने संघात नॅथन लायन आणि ऍडन झम्पा या दोन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. तर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथन कुल्टर नाईल, जेसन बेहरनडॉफ ही जलदगती गोलंदाजांची फळी आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस हे कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटविण्याची क्षमता असलेले अष्टपैलूही संघात आहे. यष्टीरक्षक म्हणून ऍलेक्स कॅरीला स्थान देण्यात आले आहे. त्याची गेल्या काही सामन्यांतील कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा हा संघ आपले विजेतेपद कायम राखतो का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. न्यूझीलंडने नुकताच आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता. आज भारतीय संघाचीही घोषणा होणार आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेच्या वातावरण निर्मितीस सुरवात झाली आहे.  

संघ पुढीलप्रमाणे : ऍरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथन कुल्टर नाईल, जेसन बेहरनडॉफ, नॅथन लायन आणि ऍडम झम्पा.

संबंधित बातम्या