महिला कबड्डीपटूंवरील बंदी स्थगित 

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

राज्य कबड्डी संघटनेच्या शिस्तपालन समितीने मार्गदर्शक राजू भावसार तसेच अनुभवी खेळाडू दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षे; तर कर्णधार सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे तसेच व्यवस्थापिका मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याची शिफारस केली होती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने पाटणा राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी शिस्तीचे पालन न केल्याबद्दल तीन खेळाडू, मार्गदर्शक तसेच व्यवस्थापिकांवर बंदी घातली होती; पण आता खेळाडूंचे हित लक्षात घेऊन त्यांच्यासह मार्गदर्शक आणि व्यवस्थापिकांवरील बंदीही स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये राज्य कबड्डी संघटनेच्या शिस्तपालन समितीने मार्गदर्शक राजू भावसार तसेच अनुभवी खेळाडू दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षे; तर कर्णधार सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे तसेच व्यवस्थापिका मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यावर राज्य कबड्डी संघटनेने नोव्हेंबरमध्ये शिक्कामोर्तब केले होते; मात्र आज झालेल्या बैठकीत सर्वांच्या भविष्याचा विचार करुन बंदी स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे, असे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी सांगितले. 

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

राज्य संघटनेच्या कार्यकारिणी कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यात बंदी स्थगित करण्याचा निर्णय झाला. आम्हाला जो काही संदेश द्यायचा होता, तो देऊन झाला आहे. खेळाडू तसेच सर्वांचे हितही लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या भविष्याचाही विचार करायला हवा, असा विचार बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर या निर्णयापूर्वी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांचे मत जाणून घेण्यात आले. त्यांनी बंदी स्थगित करण्याचीच सूचना केली; पण त्याच वेळी चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, तसेच भविष्यात सर्वांकडून शिस्तीचे कठोरपणे पालन होईल, याकडे लक्ष देण्यास सांगितले, असे राज्य कबड्डीतील सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी या बंदीचे पालन केल्यामुळे योग्य तो संदेश पोहोचला आहे, असेही सांगितले. कबड्डी सध्या कोरोनाच्या आक्रमणामुळे बंद आहे. ती कधी सुरू होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. बंदी घातलेल्यातील काही खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्न आहे. त्यांना शिक्षा देऊन झाली आहे, असेही आस्वाद पाटील यांनी सांगितले. 

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

कबड्डी दिन जिल्ह्याच्या ठिकाणी साजरा होणार 

कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनी होणारा कबड्डी दिनाचा कार्यक्रम संलग्न जिल्हा संघटनांना घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून, सुरक्षित अंतर राखून हा कार्यक्रम करण्यात येईल. राज्य कबड्डी दिनाचा मुख्य कार्यक्रम लॉकडाऊन संपल्यानंतर होईल. त्या वेळी गुणवान खेळाडू, पंच, कार्यकर्ते यांचा गौरव करण्यात येईल, असेही आस्वाद पाटील यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या