...तर राज्य कबड्डी संघटनेत पुन्हा निवडणूक 

वृत्तसंस्था
Sunday, 10 February 2019

महाराष्ट्र संघटनेची निवडणूक नुकतीच झाली असली, तरी क्रीडा संहितेची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचा निर्णय झाल्यास काही पदांवरील व्यक्तींना जावे लागेल. त्यामुळे किमान काही पदांसाठी नव्याने निवडणूक होऊ शकेल, असे मानले जात आहे. 

मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाची निवडणूक काही दिवसांवर असतानाच नव्या कार्यकारिणीस क्रीडा आचारसंहितेनुसार नव्या निवडणुका घेण्याची जबाबदारी तीन महिन्यांत पार पाडायची आहे, अशी जाणीव भारतीय कबड्डी महासंघावरील नियुक्त निरीक्षक गर्ग यांनी करून दिली. त्याचबरोबर त्या संदर्भातील पत्र संलग्न संघटनांना पाठविले आहे. 

महासंघाच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी तयार झाल्यावर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर संलग्न संघटनांना क्रीडा संहितेनुसार निवडणूक घेण्यास सांगितले आहे, याची आठवण सहा पानी पत्रात महासंघावरील निरीक्षकांनी करून दिली आहे. या पत्रामुळे अनेक राज्यांत नव्याने निवडणुका होऊ शकतील, असे मानले जात आहे.

महाराष्ट्र संघटनेची निवडणूक नुकतीच झाली असली, तरी क्रीडा संहितेची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचा निर्णय झाल्यास काही पदांवरील व्यक्तींना जावे लागेल. त्यामुळे किमान काही पदांसाठी नव्याने निवडणूक होऊ शकेल, असे मानले जात आहे. 

महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या निवडणुकीस भारतीय कबड्डी महासंघावरील निरीक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे घटनेत फार बदल होण्याची शक्‍यता नाही; पण भारतीय कबड्डी महासंघाने त्याची कठोर अंमलबजावणी केल्यास त्यानुसार घटनेत बदल करण्यास आणि निवडणूक घेण्यास पर्यायच नसेल. अर्थात याबाबत घाईघाईने मत व्यक्त करणेही चुकीचे होईल, असेही काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

नव्या कार्यकारिणीसमोर घटना बदलाचे आव्हान 
नव्याने येणाऱ्या कार्यकारिणीस भारतीय कबड्डी महासंघाच्या घटनेत बदल करावा लागेल; तसेच ती राष्ट्रीय क्रीडा संहितेशी जुळणार असेल याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर संलग्न संघटनांची घटनाही त्यानुसारच असेल. आंध्र प्रदेशने तेथील कबड्डी संघटनेसाठी याची अंमलबजावणी केली आहे, याकडेही लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर कालावधी आणि वयोमर्यादेची अंमलबजावणी आवश्‍यक आहे, याकडे लक्ष वेधले आहे. मतदारांची यादी केवळ भारतीय कबड्डी महासंघाच्या पहिल्या टप्प्यासाठीच आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या