2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती? श्रीलंकन सरकारने फाईल घेतली चौकशीला

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

या गंभीर आरोपानंतर श्रीलंकेचे विद्यमान क्रिडा मंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक दोन आठवड्यानंतर चौकशीसंदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचनाही क्रिडामंत्र्यांनी दिल्या आहेत.

कोलंबो : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वानखेडेच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची स्वप्नपूर्ती केली. 1983 नंतर भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला. या विजयासह दोन दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असल्याचे स्वप्न पूर्ण झाले. पण आता विश्वचषकातील अंतिम सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 2011 च्या विश्वचषकातील वानखेडेच्या मैदानात रंगलेला भारत-श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना फिक्स होता, असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगामे यांनी केला आहे. या आरोपाच्या अनुषंगाने श्रीलंकन सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
अलुथगामेगे म्हणाले होते की, श्रीलंकन संघाने भारताविरुद्धचा सामना जाणीवपूर्वकरित्या सोडला होता.

भज्जीने केली बहिष्काराची भाषा; चीनमधून उमटली ही प्रतिक्रिया

या गंभीर आरोपानंतर श्रीलंकेचे विद्यमान क्रिडा मंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक दोन आठवड्यानंतर चौकशीसंदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचनाही क्रिडामंत्र्यांनी दिल्या आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारे फिक्सिंगचा प्रकार घडला नव्हता, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेटा तत्कालीन कुमार संगकारा याने दिली आहे. एवढेच नाही तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावे, असे आव्हानही त्याने दिले आहे.  2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 275 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर गौतम गंभीरच्या 97 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. 

बीसीसीआय चिनी कंपनीच्या स्पॉन्सरशीपबाबत मोठा निर्णय घेणार का? 

श्रीलंकेचे तत्कालीन क्रिडामंत्री अलुथगामेगे यांनी आरोप केलाय की, आम्ही 2011 चा विश्वचषक गमावला नाही तर आम्ही तो विकला होता. देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे मला ही गोष्ट बोलता आली नाही. त्या सामन्यात आम्ही जाणीपूर्वक पराभूत झालो असे मला अजूनही वाटते. या प्रकरणावर वादविवाद करायचा नाही. पण हे सत्य आहे की आम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला नव्हता. अशा शब्दात त्यांनी सामना फिक्स असल्याचे म्हटले आहे. कुमार संगकाराने मात्र पुरावे दाखवा असे म्हणत हा आरोप फेटाळून लावला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या