2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती? श्रीलंकन सरकारची फौजदारी चौकशी सुरु

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

श्रीलंकेचे माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगामे यांनी, 2011 च्या विश्वचषकातील  भारत-श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता श्रीलंकन सरकारने या प्रकरणाची फौजदारी चौकशी सुरु केली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाने 1983 नंतर 2011 मध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईतील वानखेडे मैदानावर श्रीलंकेला अंतिम सामन्यात नमवत इतिहास रचला होता. पण त्यानंतर आता विश्वचषकादरम्यान भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगामे यांनी, 2011 च्या विश्वचषकातील  भारत-श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता श्रीलंकन सरकारने या प्रकरणाची फौजदारी चौकशी सुरु केली आहे. 

श्रीलंकेचे तत्कालीन क्रिडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी या महिन्याच्या सुरवातीला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान, 2011 चा विश्वचषक श्रीलंकेने गमावला नव्हता तर तो विकला असल्याचे म्हटले होते. तसेच त्यावेळेस आपण देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे ही गोष्ट बोलता आली नसल्याचे म्हणत, अलुथगामेगे यांनी अंतिम सामन्यात श्रीलंका जाणीपूर्वक पराभूत झाला असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारे फिक्सिंगचा प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रिया, श्रीलंकेच्या तत्कालीन क्रिकेटपटू कुमार संगकाराने दिली होती. यासोबतच आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करण्याचे आवाहन देखील संगकाराने दिले होते. 

चेंडूला चमकावण्यासाठी आयसीसीने दुसरा पर्याय देणे गरजेचे - भुवनेश्वर कुमार

मात्र त्यानंतर श्रीलंकेचे सध्याचे क्रिडा मंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी या प्रकरणावर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. व प्रत्येक दोन आठवड्यानंतर चौकशीसंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. आता श्रीलंकेत या प्रकरणावर फौजदारी चौकशी सुरु झाली असून, 2011च्या फायनलसाठी म्हणून श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि संघाचा मुख्य निवडकर्ता असलेल्या अरविंदा डी सिल्वा यांना आज मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.  

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार लगावणारे खेळाडू माहिती आहेत का ?         

2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 275 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर गौतम गंभीरच्या 97 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या विजयासह दोन दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.  

 


​ ​

संबंधित बातम्या