शोमन लसित मलिंगा जागतिक क्रिकेटलाही हवा

मुकुंद पोतदार
Sunday, 16 September 2018

मलिंगाने अर्थातच नव्या चेंडूवर मारा सुरु केला. पाचव्याच चेंडूवर त्याने लिटन दासला बाद केले. मग सहाव्या चेंडूवर त्याने शकीब अल हसन याचा त्रिफळा उडविला. नंतर मुशफीकउर रहीम  याने पुढील षटकात त्याची हॅट््ट्रिक हुकविली. मलिंगाने दहा पैकी दोन षटके मेडन टाकत 23 धावांत चार विकेट घेतल्या. श्रीलंकेने हा सामना गमावला, पण मलिंगाने निराशा केली नव्हती. त्याच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी आपली कामगिरी पार पाडली होती.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला दुबईत शनिवारी प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढतीत वेगवान गोलंदाज लसित मलिंगा याचे पुनरागमन चर्चेचा विषय होते. वन-डे संघातील उपयुक्तता त्याला सिद्ध करायची होती. श्रीलंकेने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी त्याला पुन्हा संघात सामावून घेतले आहे. क्रीडा मंत्र्यांवरील टीका, आयपीएलला पसंती देताना राष्ट्रीय संघाकडे किंवा शिबीराकडे पाठ फिरविणे अशा कारणांमुळे मलिंगा वादात सापडला होता. त्याचवेळी चपळ फिल्डर नसल्याचाही त्याला फटका बसत होता. यानंतरही श्रीलंकेच्या निवड समितीने त्याला पाचारण केले आहे. याचे कारण तो एक नैसर्गिक प्रतिभा असलेला खेळाडू आहे.

क्रिकेटमध्ये एका उक्तीचा नेहमीच दाखला दिला जातो. Form is temporaty. Class is permanent. मलिंगाच्या बाबतीत हे लागू होते. पुनरागमनात त्याने हेच सिद्ध करून दाखविले.

मलिंगाने अर्थातच नव्या चेंडूवर मारा सुरु केला. पाचव्याच चेंडूवर त्याने लिटन दासला बाद केले. मग सहाव्या चेंडूवर त्याने शकीब अल हसन याचा त्रिफळा उडविला. नंतर मुशफीकउर रहीम  याने पुढील षटकात त्याची हॅट््ट्रिक हुकविली. मलिंगाने दहा पैकी दोन षटके मेडन टाकत 23 धावांत चार विकेट घेतल्या. श्रीलंकेने हा सामना गमावला, पण मलिंगाने निराशा केली नव्हती. त्याच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी आपली कामगिरी पार पाडली होती.

मलिंगाचा यॉर्कर हा भल्या-भल्या फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये त्याने तीन हॅट््ट्रीक घेतल्या असून हा पराक्रम केलेला सुद्धा तो एकमेव आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने दोन वेळा हॅट््ट्रीक केली. 2007 मध्ये त्याने चमत्कार केला. वेस्ट इंडिजमध्ये हा वर्ल्ड कप झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेने पकड गमावली होती. 210 धावांच्या आव्हानासमोर जॅक् कॅलिस टिकला होता. शॉन पोलॉक त्याच्या जोडीला होता. त्यावेळी कर्णधार माहेला जयवर्धने याने मलिंगाकडे चेंडू सोपविला.

45व्या षटकात मलिंगाने पहिले चार यॉर्कर टाकले. मग त्याने स्लोअर वन टाकत पोलॉकचा त्रिफळा उडविला. त्यानंतर अँड्रयू हॉल याने यॉर्करवरच झे दिला. पुढील षटकात मलिंगाने कॅलिसला यष्टिमागे झेल देण्यास भाग पाडले. मग मखाय एन्टिनी याचा त्रिफळा उडविला. आफ्रिकेने हा सामना कसाबसा जिंकला, पण मलिंगाची कामगिरी अख्यायिका बनली.

याच मलिंगाची अॅक्शन, त्याचे भेदक यॉर्कर, भन्नाट सोनेरी कुरळे केस असे सारे काही हिट होत गेले. मलिंगाने झटपट क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2011 मध्येच त्याने हा निर्णय घेतला.
ताशी 140 किलोमीटर वेगाने मारा करण्याची क्षमता असलेल्या मलिंगाच्या दर्जाचे कौतूक सचिन तेंडूलकर याच्यासह अनेकांनी केले आहे. आशिया करंडकात पुनरागमन केलेल्या मलिंगाचे केस थोडे कापलेले होते, त्याचे वजनही काहीसे वाढल्यासारखे वाटले. एक गोष्ट मात्र बदलली नव्हती आणि ती म्हणजे त्याची विकेट घेण्याची क्षमता. मलिंगा हा एक शोमन आहे. त्याच्यासारखी हेअरस्टाईल असलेले विग घेऊन अनेक चाहते सामने पाहायला येतात. हा शोमन श्रीलंका क्रिकेटलाच नव्हे तर जागतिक क्रिकेटला सुद्धा हवा आहे हेच त्याच्या पुनरागमनावरून दिसून आले.

संबंधित बातम्या