क्रीडा क्षेत्राला आता निधीची कमतरता नाही : राठोड 

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

ऑलिंपिकसाठी खेळाडू घडवताना पूर्वी निधीचा कमी पडायचा, पण आता ती स्थिती राहिलेली नाही. अनेक कॉर्पोरेट कंपन्या पुढे येऊन त्यांनी मुबलक निधी देण्यास सुरवात केली आहे. या अगोदरचा निधी वेगळ्या मार्गाने जायचा, पण आता एकाच ध्येयाकडे अचूक पद्धतीने त्याचे एकत्रीकरण केले जाईल, असेही क्रीडामंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राला आता निधीची कमतरता नाही, अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या थैल्या उघडल्या आहेत. मात्र हा निधी योग्य पद्धतीने खेळाडूंपर्यंत जायला हवा याचसाठी आम्ही काम करणार आहोत. 2020 च्या ऑलिंपिक तयारीसाठी खेळाडूंसाठीच्या निधीचे त्यांच्यापर्यंत अचूक आणि योग्य वाटप करण्यात येईल, अशी भूमिका क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी व्यक्त केली.

निमित्त होते आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे! 
ग्रासरूट आणि एलिट खेळाडू यांच्यासाठी काम करण्याची आम्ही पद्धत विभागली आहे. एलिट खेळाडूंना व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार केले जाईल, त्यात कोणतीही नोकरशाही असणार नाही. तसेट "टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम' (टॉप्स) या योजनेतील पारदर्शकता अधिक स्पष्ट करण्यासाठी आम्ही नवी रचना सुरू केली आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली. टॉप्स ही योजना 2014 पासून सुरू झालेली आहे. 

ऑलिंपिकसाठी खेळाडू घडवताना पूर्वी निधीचा कमी पडायचा, पण आता ती स्थिती राहिलेली नाही. अनेक कॉर्पोरेट कंपन्या पुढे येऊन त्यांनी मुबलक निधी देण्यास सुरवात केली आहे. या अगोदरचा निधी वेगळ्या मार्गाने जायचा, पण आता एकाच ध्येयाकडे अचूक पद्धतीने त्याचे एकत्रीकरण केले जाईल, असेही क्रीडामंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

यंदाच्या आशियाई स्पर्धेत 69 पदके मिळविल्यानंतर टोक्‍यो ऑलिंपिकमध्ये पदकांच्या अपेक्षा किती असतील, यावर बोलताना राठोड म्हणाले, की पुढील आव्हान स्वीकारण्यासाठी ऍथलीटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील. केवळ 2020 नव्हे तर 2024 आणि 2028 च्या ऑलिंपिकच्याही दिशेने आम्ही विचार प्रक्रिया सुरू केली आहे. 

2024 आणि 2028 च्या ऑलिपिंकमध्ये आपले खरे यश दिसून येईल, पण आताही कोठे कमी पडणार नाही. टोकियोतील ऑलिंपिकसाठी प्रत्येक ऍथलीटला तयारीकरिता निधीचे साह्य दिले जाईल. टॉप्सच्या समितीमध्ये दिग्गज प्रकाश पदुकोण आणि बॉक्‍सिंग फेडरेशनचे सरचिटणीस पीकेएम राजा यांच्यासारखे खेळाडू आणि संघटत आहेत. तसेच आम्ही केवळ आपल्या खेळाडूंचाच नव्हे तर प्रतिस्पर्ध्यांचाही विचार करून तयारी करणार असल्याचे राठोड म्हणाले. 

प्रत्येक तीन महिन्यांनंतर एकेक खेळाची संघटना त्यांच्या प्रगतीबाबत प्रेझेंटेशन देणार आहे. "टॉप्स'ची समिती व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल, तसेच खेळाडूंच्या दुखापतींवर त्यांची नजर असेल, त्यामुळे दुखापतींची अडचण येणार नाही. 
- राजवर्धन राठोड, क्रीडामंत्री 


​ ​

संबंधित बातम्या