17 जुलै नंतर गांगुली बीसीसीच्या बैठकीला नसणार? काय आहे कारण

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 July 2020

आता जय शहा यांचा हा कालावधी यापूर्वीच संपला आहे; तर सौरव गांगुली तसेच सहसचिव जयेश जॉर्ज यांचा कालावधी या महिन्याअखेर संपत आहे. नियमानुसार आता त्यांना पदावरून ब्रेक घेणे भाग पडेल.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारी परिषदेची 17 जुलैस बैठक होणार आहे. या बैठकीला सचिव जय शहा यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम आहे. त्याच वेळी अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही ही कदाचित अखेरची बैठक ठरू शकेल. भारतीय क्रिकेट मंडळाच्या नव्या घटनेनुसार पदाधिकाऱ्यांना सलग सहा वर्षे पदावर राहता येत नाही. आता जय शहा यांचा हा कालावधी यापूर्वीच संपला आहे; तर सौरव गांगुली तसेच सहसचिव जयेश जॉर्ज यांचा कालावधी या महिन्याअखेर संपत आहे. नियमानुसार आता त्यांना पदावरून ब्रेक घेणे भाग पडेल. मात्र अध्यक्ष, सचिव तसेच सहसचिवांसाठी हा नियम नसावा, यासाठी यापूर्वीच भारतीय मंडळाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

जाहिरातदारांमध्येच निरुत्साह...काय होणार मग आयपीएलचे?

शहा यांचा कार्यकारी परिषदेतील सहभाग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल, असे शहा यांनी कार्यकारी परिषदेतील सहकारी सदस्यांना सांगितल्याचे समजते. आता कार्यकारी परिषदेत घटनेतील बदलावर चर्चा करावी, असे परिषदेतील कॅगच्या सदस्या अलका रेहानी भारद्वाज यांनी सुचवले असल्याचे समजते. त्यांनी प्रत्येक बैठकीस पात्र सदस्यांनीच उपस्थित राहावे, असे सुचवले आहे.

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमास अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे; तसेच राष्ट्रीय स्पर्धांबाबतही निर्णय होईल. त्याच वेळी आयपीएल पुरस्कर्त्यांबाबतही चर्चा अपेक्षित आहे; मात्र त्याच वेळी सचिवांपाठोपाठ अध्यक्ष आणि सहसचिवही बैठकीत उपस्थित राहू न शकल्यास काय पर्याय असतील, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या