गांगुली होणार बीसीसीआयचा नवा अध्यक्ष?

वृत्तसंस्था
Saturday, 11 August 2018

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर.एम. लोढा समितीच्या काही शिफारशी बाजूला ठेवल्यानंतर आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरभ गांगलीची निवड होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर.एम. लोढा समितीच्या काही शिफारशी बाजूला ठेवल्यानंतर आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरभ गांगलीची निवड होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला मागील काळात झालेल्या प्रशासकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी एका माजी क्रिकेटपटूने अध्यक्षपदाचा कारभार पाहावा अशी अपेक्षा आहे.

कूलिंग-ऑफ कालावधीमुळे बहुतेक आजी आणि माजी प्रशासक अपात्र ठरले आहेत, परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनचा तिसऱ्यांदा अध्यक्ष असलेला सौरभ गांगुली हा या पदासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. तो यापूर्वी देखील बीसीसीआयच्या तांत्रिक समिती, क्रिकेट सल्लागार समिती आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्येही सहभागी झाला होता.

चार वर्षांपासून प्रशासक म्हणून काम करणाऱ्या 46 वर्षीय गांगुली बीसीसीआयची निवडणूक लढण्यास पात्र ठरेल. नव्याने मंजूर झालेल्या बीसीसीआयच्या घटनेनुसार अध्यक्षपदासाठी कोणत्याही राज्य संघटनेचे प्रतिनिधी अर्ज करू शकतात, मात्र दुसऱ्या व्यक्तीचा त्याला पाठिंबा लागेल.

गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यास त्याला पुढील दोन वर्षे पद सोडावे लागेल कारण त्याचा सहा वर्षांचा एकत्रित कालावधी पूर्ण होईल. ''तो निश्चितपणे पात्र आहे,'' असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकही विरोधक नसेल तरच गांगुली निवडणुकीत सहभागी होणार आहे.

संबंधित बातम्या