सोलापुरात रंगणार संतोष फुटबॉल ट्रॉफीचे सामने

अलताफ कडकाले
Monday, 4 February 2019

देशातील प्रतिष्ठेची समजली जाणारी संतोष करंडक (ट्रॉफी) फुटबॉल स्पर्धा येत्या 7 ते 12 फेब्रुवारीला सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. यंदाच्या विभागीय संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेचे पश्‍चिम विभागाचे यजमानपद महाराष्ट्राला देण्यात आले आहे.

सोलापूर, ता. 4 : देशातील प्रतिष्ठेची समजली जाणारी संतोष करंडक (ट्रॉफी) फुटबॉल स्पर्धा येत्या 7 ते 12 फेब्रुवारीला सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. यंदाच्या विभागीय संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेचे पश्‍चिम विभागाचे यजमानपद महाराष्ट्राला देण्यात आले आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व सोलापूर जिल्हा संघटनेच्या सहकार्याने स्पर्धा होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्‍त व स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आज (सोमवारी) हॉटेल सिटी पार्क येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी स्पर्धा संयोजन समितीचे कार्याध्यक्ष महेश गादेकर, सोलापूर शहर आणि जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. किरण चव्हाण, असोसिएशनचे खजिनदार आनंद चव्हाण आदी उपस्थित होते. या स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने होत आहेत. खजिनदार आनंद चव्हाण यांनी आभार मानले. 

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा सोलापूर शहरात होत आहे, ही आनंद देणारी गोष्ट आहे. या स्पर्धेसाठी "अ' आणि "ब' असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. शहरातील तरुण वर्ग फुटबॉलकडे आकर्षित झाला पाहिजे. फुटबॉलची एक क्रेझ निर्माण झाली पाहिजे. फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त शहरवासीयांनी उपस्थित राहून चेअरप केले पाहिजे. 
- डॉ. अविनाश ढाकणे, 
अध्यक्ष, स्पर्धा आयोजन समिती 

 

'अ' गटात 
गोवा 
मध्य प्रदेश 
दमन आणि दीव 
लक्षद्वीप 

'ब'गटात 
महाराष्ट्र 
राजस्थान 
गुजरात 
दादर आणि नागर हवेली 


​ ​

संबंधित बातम्या