... म्हणून आयपीएल संघ मालक झाले बीसीसीआयवर नाराज

संजय घारपुरे
Wednesday, 29 July 2020

आयपीएल अमीरातीत घेण्याची भारतीय क्रिकेट मंडळ तयारी करीत आहे. पण या लीगचा महत्त्वाचा भाग असलेल्या फ्रॅंचाईजना याबाबत काहीही सांगितले जात नाही. आम्हाला या लीगबाबतच्या घडामोडी माध्यमांकडूनच कळत आहेत, भारतीय मंडळाने काहीही कळवलेले नाही, अशी खंत फ्रॅंचाईज व्यक्त करीत आहेत. 

मुंबई : आयपीएल अमीरातीत घेण्याची भारतीय क्रिकेट मंडळ तयारी करीत आहे. पण या लीगचा महत्त्वाचा भाग असलेल्या फ्रॅंचाईजना याबाबत काहीही सांगितले जात नाही. आम्हाला या लीगबाबतच्या घडामोडी माध्यमांकडूनच कळत आहेत, भारतीय मंडळाने काहीही कळवलेले नाही, अशी खंत फ्रॅंचाईज व्यक्त करीत आहेत. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात  

भारतीय मंडळ अथवा आयपीएल प्रशासकीय समितीने आम्हाला काहीही कळवलेले नाही. आम्हाला जे काही कळत आहे ते सोर्समुळे किंवा माध्यमांमुळे. त्याच्यामुळेच आम्हाला लीगचा कालावधी समजला. लीग परदेशात होते, त्यावेळी अनेक प्रश्न असतात. आम्हाला काही नीट सांगितलेच नाही, तर त्याबाबत योजना कशी तयार करणार अशी विचारणा दक्षिण भारतातील एका फ्रॅंचाईजनी केली आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

प्रशासकीय समितीची बैठक झाल्यावर भारतीय मंडळ आमच्याशी चर्चा करेल अशी आशा आहे. खेळाडूंना अमीरातीत नेणे, तिथे संघाचा बेस तयार करणे यासारखे आव्हान आहे. त्यापेक्षाही भारतीय खेळाडू मार्चपासून मैदानावर उतरलेले नाहीत. अमीरातील वातावरणाशी जुळवून घेणेही महत्त्वाचे असेल. भारतीय मंडळ आमच्याशी काही बोलतच नाही, असे उत्तर विभागातील एका फ्रॅंचाईजनी सांगितले. भारतीय मंडळ आम्हाला विश्वासात घेऊन काहीच सांगत नाही. आम्हाला लीगसाठीची नवी नियमावली त्यांनी सांगायला हवी. आम्हीच प्रवासाची, निवासाची व्यवस्था करणार असू, त्यासाठी आत्तापासून चर्चा करावी लागेल, असे उत्तरेतील अन्य एका फ्रॅंचाईजनी सांगितले. 

आयपीएल संघांचा ऑगस्टपासून सराव 
आयपीएलसाठी फ्रॅंचाईजना संघाचा एका महिन्याचा सराव हवा आहे. चेन्नई सुपर किंग्जचा दुबईतील सराव 10 ऑगस्टपासून होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने ते खेळांच्या प्रवासाची योजना तयार करीत आहेत. त्याचवेळी अन्य संघ पंधरा ऑगस्टपासून सराव सुरु करण्याची तयारी करीत आहेत. 

लीगपासूनच्या उत्पन्नामुळे प्रश्न 
अमीरातीत पूर्ण लीग होणार आहे. या परिस्थितीत तिकीट विक्रीचे उत्पन्न कोणत्या संघाचे असणार याबाबतही भारतीय मंडळ काहीही सांगण्यास तयार नाही. आता सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यावेळी त्याचे उत्पन्न कदाचीत अमीराती क्रिकेट मंडळाचेही असेल. आता याबाबतची भरपाई भारतीय क्रिकेट मंडळ करणार का हाही प्रश्न फ्रॅंचाईज विचारत आहेत. 

प्रशासकीय समितीची बैठक लांबणीवर? 
आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक यापूर्वीच एकऐवजी दोन ऑगस्टला घेण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारने अमीरातीतील लीगसाठी मंजूरी तोपर्यंत न दिल्यास ही बैठक अजूनही लांबणीवर पडू शकेल असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने अमीरातीमधील लीगला मंजूरी दिल्यानंतरच प्रशासकीय समितीची बैठक होईल, असे मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले. त्यांनी याचवेळी केंद्राचे पत्र आल्यावर काही तासात बैठक होऊ शकेल. सर्व सदस्यांची बैठकीसाठी तयारी झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर लगेचच स्टार इंडिया तसेच फ्रॅंचाईजबरोबर चर्चा होणार आहे. 

भारतीय मंडळाच्या या आगळ्या कार्यपद्धतीची आम्हाला सवय झाली आहे. सर्व गोष्टी आम्हाला बाहेरुनच कळतात. हे समजणाऱ्यात आम्ही फ्रॅंचाईज सर्वात शेवटी असतो. 
- फ्रॅंचाईज पदाधिकारी


​ ​

संबंधित बातम्या