"ऑली' शब्द वापरण्यास मेरीला परवानगी

वृत्तसंस्था
Thursday, 7 November 2019

- भारताची बॉक्‍सिंगची आदर्श खेळाडू माजी जगज्जेती मेरी कोम हिला आपल्या नावापुढे "ऑली' हा शब्द वापरण्यास जागतिक ऑलिंपिक संघटनेने मान्यता दिली

- हौशी स्तरावर जागतिक स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य, एक ब्रॉंझ अशी कामगिरी करणारी मेरी एकमेव खेळाडू आहे. 

नवी दिल्ली - भारताची बॉक्‍सिंगची आदर्श खेळाडू माजी जगज्जेती मेरी कोम हिला आपल्या नावापुढे "ऑली' हा शब्द वापरण्यास जागतिक ऑलिंपिक संघटनेने मान्यता दिली आहे. या परवानगीबद्दल मेरीने जागतिक संघटनेला धन्यवाद दिले आहेत. 
जागतिक संघटनेकडून हा सन्मान मिळाल्याची माहिती मेरीने त्यांच्याकडून आलेले प्रशस्तिपत्रक "ट्‌विटर' प्रसिद्ध करून दिली आहे. मेरीने सहा वेळा जगज्जेतेपद मिळविले आहे. गेल्याच महिन्यात तिला जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. मेरीचे हे जागतिक स्पर्धेतील आठवे पदक ठरले होते. हौशी स्तरावर जागतिक स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य, एक ब्रॉंझ अशी कामगिरी करणारी मेरी एकमेव खेळाडू आहे. 
------------ 
"ऑली'चे महत्त्व काय 
क्रीडा क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्राबाहेर वावरताना जो खेळाडू ऑलिंपिक चळवळीचा प्रसार करतो आणि त्याची मार्गदर्शक तत्त्वे जपत असतो, अशा खेळाडूला "ऑलिंपियन' म्हणून आपल्या नावापुढे "ऑली' हा शब्द वापरता येतो. ऑलिंपिक खेळाडू कितीही असले, तरी हा मान प्रत्येकाला मिळत नाही. मेरीला हा मान मिळाला आणि जागतिक संघटनेकडून तसे प्रशस्तिपत्रकही तिला मिळाले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या