सिफानने माईल शर्यतीत मोडला 23 वर्षे जुना विक्रम! 

वृत्तसंस्था
Saturday, 13 July 2019

- जन्माने इथिओपीयन असलेल्या नेदरलॅंडच्या सिफान हसनने मोनॅको डायमंड लीग ऍथलेटिक्‍स स्पर्धेत माईल शर्यतीत नवीन विश्‍वविक्रमाची नोंद केली. 

- हे करताना 23 वर्षे जुना विश्‍वविक्रम मोडीत काढला. 

- इथिओपियातील अदाना येथे जन्मलेल्या आणि 2008 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी निर्वासित म्हणून नेदरलॅंडमध्ये दाखल झालेल्या सिफानने धावण्यालाच आपले जीवन केले.

मोनॅको : जन्माने इथिओपीयन असलेल्या नेदरलॅंडच्या सिफान हसनने मोनॅको डायमंड लीग ऍथलेटिक्‍स स्पर्धेत माईल शर्यतीत नवीन विश्‍वविक्रमाची नोंद करताना 23 वर्षे जुना विश्‍वविक्रम मोडीत काढला. 
इथिओपियातील अदाना येथे जन्मलेल्या आणि 2008 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी निर्वासित म्हणून नेदरलॅंडमध्ये दाखल झालेल्या सिफानने धावण्यालाच आपले जीवन केले.

शर्यत सुरू झाली त्यावेळी ती विश्‍वविक्रम करेल याविषयी शंका होती. मात्र, शेवटचे सहाशे मीटर एकटीच पळताना तिने अखेर 4 मिनिटे 12.33 सेकंदांत अंतिम रेषा पार केली आणि 23 वर्षांपासून रशियाच्या स्वेतलाना मास्टरकोवाच्या नावावर असलेल्या 4 मिनिटे 12.56 सेकंदाचा विश्‍वविक्रम इतिहास जमा केला. स्वेतलानाने 1996 मध्ये झ्युरीच येथे हा विक्रम केला होता. 

प्रथम आठशे मीटर अंतर पूर्ण झाले त्यावेळी विश्‍वविक्रमासाठी आवश्‍यक असलेल्या वेळेपेक्षा सिफानची वेळ दीड सेकंद संथ होती. तिने हे अंतर 2 मिनिटे 08.5 सेकंदांत पूर्ण केले होते. शेवटची फेरी तिने प्रेक्षकांच्या पाठिंब्याने केवळ 60 सेकंदांच्या आत पूर्ण केली. शर्यत पूर्ण करताच ती ट्रॅकवर कोसळली. यंदा तिने केलेला हा दुसरा विश्‍वविक्रम होय. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोनॅको येथेच पाच किलोमीटर रोड रेसमध्ये तिने 14 मिनिटे 44 सेकंदांचा विश्‍वविक्रम केला होता.

"मी वेगाने धावू शकते, हे मला माहीत होते. परंतु, प्रथम 800 मीटर संथ झाल्यावर विश्‍वविक्रमाविषयी विचार केला नाही. अंतिम रेषा पार केल्यावर आश्‍चर्य वाटले. प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असताना शेवटची फेरी मारणे हा वेगळाच अनुभव होता. 

-सिफान हसन 
विश्‍वविक्रमवीर, महिला माईल शर्यत. 

सिफानची कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ 
800 - 1 मि. 56.81 सेकंद (2017) 
1000 - 2 मि. 34.68 सेकंद (2015) 
1500 - 3 मि. 55.30 सेकंद (2019) 
5000 - 14 मि. 22.34 सेकंद (2018) 
10000 - 31 मि. 18.12 सेकंद (2019) 
अर्ध मॅरेथॉन - 1 तास 05.15 सेकंद (2018).


​ ​

संबंधित बातम्या