वादग्रस्त प्रशिक्षकाच्या शिष्येचे दुसरे सुवर्ण

नरेश शेळके
Monday, 7 October 2019

- डोपिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या उत्तेजक विरोधी संस्थेने चार वर्षांची बंदी टाकलेले प्रशिक्षक अल्बर्तो सालाझार यांची शिष्या नेदरलॅंडची सिफान हसन हिने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांची पंधराशे मीटर शर्यत स्पर्धा विक्रमासह जिंकली.

-  इथिओपीयन असलेल्या सिफानचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण असून तिने दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले होते

- महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत केनियाच्या हेलेन ओबीरीने सुवर्णपदक कायम राखताना नवीन स्पर्धा विक्रमाची नोंद केली.

दोहा -  डोपिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या उत्तेजक विरोधी संस्थेने चार वर्षांची बंदी टाकलेले प्रशिक्षक अल्बर्तो सालाझार यांची शिष्या नेदरलॅंडची सिफान हसन हिने जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांची पंधराशे मीटर शर्यत स्पर्धा विक्रमासह जिंकली. जन्माने इथिओपीयन असलेल्या सिफानचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण असून तिने दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले होते. स्पर्धेच्या इतिहासात मध्यम व लांब पल्ल्याच्या शर्यतीत सुवर्ण अशी कामगिरी प्रथमच झाली. 
सालाझार यांच्या डावपेचाप्रमाणे सिफानने दहा हजार मीटर आणि पंधराशेच्या प्राथमिक व उपांत्य फेरीत मागे राहून शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली होती. पंधराशेच्या अंतिम शर्यतीत मात्र, तिने सुरवातीपासून आघाडी घेण्यास सुरवात केली. त्यामुळे केनियाच्या फैथ किपयेगॉनला संधीच मिळाली नाही. सिफानने तातयाना तोमाशोवाचा स्पर्धा विक्रम तब्बल सात सेकंदाने मोडीत काढला. 
महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत केनियाच्या हेलेन ओबीरीने सुवर्णपदक कायम राखताना नवीन स्पर्धा विक्रमाची नोंद केली. महिलांच्या तिहेरी उडीत व्हेनेझुएलाच्या युलामार रोजासने सलग दुसऱ्या स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली. महिलांच्या 4 बाय 100 रिलेत जमैकाने सुवर्णपदक जिंकले. यामुळे शेली ऍन फ्रेझर-प्रिसेने आपल्या खाती आणखी एक सुवर्णपदक जमा केले. यामुळे तिच्या नावावर जागतिक स्पर्धेत नऊ सुवर्णासह एकूण अकरा पदके जमा झाली आहेत. यामुळे सुवर्णपदकांच्या बाबतीत ती ऍलीसन फेलिक्‍स आणि उसेन बोल्ट यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांत अमेरिका संघाने सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे वेगवान धावपटू ठरलेल्या ख्रिस्तीयन कोलमनला दुसरे सुवर्णपदक जिंकता आले. 
पुरुष गोळाफेकीची स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. अमेरिकेच्या जो कोवॅसने 22.91 मीटरच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले, तर ऑलिंपिक विजेत्या अमेरिकेच्या रायन क्राऊझरला 22.90 मीटरसह रौप्य मिळाले. गतविजेता न्यूझीलंडचा तोमास वाल्श 22.90 मीटरसह ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. रायन व तोमास यांची कामगिरी सारखी असली तरी रायनची दुसरी सर्वोत्तम फेक 22.71 तर वाल्शची 22.56 असल्याने रायनला रौप्यपदक देण्यात आले. 

भारतीयांचे आव्हान आटोपले 

भारताला 4 बाय 400 रिले संघाकडून अंतिम फेरीची अपेक्षा होती. मात्र, पुरुष व महिला असे दोन्ही संघ प्राथमिक फेरीतच गारद झाले. त्यामुळे त्यांना आता टोकियो ऑलिंपिकची पात्रता गाठण्यासाठी नव्याने प्रयत्न करावा लागेल. जिस्ना मॅथ्यू, व्ही. के. विस्मया, पुवम्मा आणि सुभाचा समावेश असलेल्या महिला संघाला सहावे स्थान मिळाले. त्यांनी 3 मिनिटे 29.42 सेकंद अशी यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम वेळ नोंदवली. अमोल जेकब, महम्मद अनस, के. एस. जीवन आणि निर्मल तोमचा समावेश असलेला भारतीय संघ प्राथमिक फेरीत सातवा आला. त्यांनी 3 मिनिटे 03.09 सेकंद अशी वेळ दिली. भालाफेकीत नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत शिवपालसिंगच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, तो फक्त 78.97 मीटर अशीच कामगिरी करू शकला आणि पात्रता फेरीत दहावा आल्याने अंतिम फेरीत स्थान मिळू शकला नाही. पुरुष मॅरेथॉनमध्ये टी. गोपीला 21 वे स्थान मिळाले. त्याने 2 तास 15 मिनिटे 57 सेकंद अशी वेळ दिली. 

निकाल ः पुरुष - मॅरेथॉन - लेलिसा देसिसा (इथिओपीया, 2 तास 10मि.40 सेकंद), मोसीनेट गेरेमेव (इथिओपीया, 2 तास 10 मि.44 सेकंद), अमोस किपरुटो (केनिया, 2 तास 10 मि.51 सेकंद). 4-100 रिले - अमेरिका (37.10 सेकंद), ग्रेट ब्रिटन (37.36 सेकंद), जपान (37.43 सेकंद). महिला - 1500 मीटर - सिफान हसन (नेदरलॅंड, 3 मि.51.95 सेकंद), फैथ किपयेगॉन (केनिया, 3 मि.54.22 सेकंद), गुडाफ सेगाय (इथिओपीया, 3 मि.54.38 सेकंद), 5000 मीटर - हेलेन ओबीरी (केनिया, 14 मि.26.72 सेकंद), मार्गरेट किपकेम्बोई (केनिया, 14मि.27.49 सेकंद), कोन्स्टाझ क्‍लोस्टरहालफेन (जर्मनी, 14 मि.28.43 सेकंद). 


​ ​

संबंधित बातम्या