खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये शुभमचे विक्रमासह सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 January 2019

वेटलिफ्टिंग खेळाडूंनीदेखील महाराष्ट्राच्या पदकांचा भार उचलण्यास दुसऱ्या दिवसापासून सुरवात केली. या क्रीडा प्रकाराच्या पहिल्याच दिवशी 17 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्राच्या अभिषेक महाजन याने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले.

पुणे : वेटलिफ्टिंग खेळाडूंनीदेखील महाराष्ट्राच्या पदकांचा भार उचलण्यास दुसऱ्या दिवसापासून सुरवात केली. या क्रीडा प्रकाराच्या पहिल्याच दिवशी 17 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्राच्या अभिषेक महाजन याने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. शुभम कोळेकर याने 21 वर्षांखालील वयोगटात विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

प्रवीण पाटील कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकत असताना संकुलातील प्रवेश द्वाराजवळच असणाऱ्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये अभिषेक महाजन याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने स्नॅचमध्ये 90 किलो, तर क्‍लीन अँड जर्क प्रकारात 121 किलो असे एकूण 211 किलो वजन उचलले. छत्तीसगडचा सुभाष लहारे (91 आणि 114 किलो, एकूण 205 किलो) रौप्य, तर गोलम टिकू याने (89, 112 एकूण 201 किलो) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. 

शुभमने महाराष्ट्राला या क्रीडा प्रकारातील दुसरे यश मिळवून देताना 21 वर्षांखालील गटात 55 किलो प्रकारात विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. या सुवर्ण कामगिरीत त्याने क्‍लीन अँड जर्क प्रकारात 139 किलो वजन उचलतानाच आपला 138 किलोंचा विक्रम मोडीत काढला. त्याने स्नॅचमध्ये 97 असे एकूण 236 किलो वजन उचलून सुवर्ण कामगिरी केली. शुभम सांगलीत संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने यापूर्वी विशाखापट्टणम येथील सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते. अलीकडेच नागपूर येथे झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्ण कामगिरी केली. 

महाराष्ट्राच्या प्रशांत कोळी याने 55 किलो वजन गटात स्नॅच 104 आणि क्‍लीन अँड जर्क 121 असे एकूण 225 किलो वजन उचलले. तो ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. वेटलिफ्टिंग प्रकारात पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने दोन सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई केली. ओडिशाचा मुन्ना नायक 230 किलो वजन उचलून ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. 


​ ​

संबंधित बातम्या