नवव्या आशियाई योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

दक्षिण कोरीया येथे झालेल्या नवव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप क्रीडास्पर्धेत कोंढवळे (ता.मुळशी) येथील श्रेया शंकर कंधारे हिने 17 ते 21 वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावित यशाला गवसणी घातली आहे. आठ देशातील दोनशे पेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने प्रथम क्रमांक पटकावित भारताच्या तिरंग्याचा मान जगात उंचावला आहे. 

पुणे : दक्षिण कोरीया येथे झालेल्या नवव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप क्रीडास्पर्धेत कोंढवळे (ता.मुळशी) येथील श्रेया शंकर कंधारे हिने 17 ते 21 वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावित यशाला गवसणी घातली आहे. आठ देशातील दोनशे पेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने प्रथम क्रमांक पटकावित भारताच्या तिरंग्याचा मान जगात उंचावला आहे. 

पतियाला (पंजाब) भारतीय योगा फेडरेशनद्वारा झालेल्या 43 व्या राष्ट्रीय योग चॅम्पियनशीप स्पर्धेत जिगरबाज कामगिरी केल्यानंतर एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती. ही स्पर्धा दक्षिण कोरीयातील योसू शहरात झाली. त्यात श्रेयाने 17 ते 21 वर्षे वयोगटात दक्षिण कोरीया, मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, मंगोलिया, हॉंगकॉंग, भारत आणि इराण या देशातील योगापटूंना मागे सारत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 

श्रेयाने दोन वर्षापूर्वी सिंगापूरला झालेल्या जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवून भारताचे योगासनातील नाव जगात गाजविले होते. गतवर्षी अर्जेटिंनाच्या जागतिक स्पर्धेत तिेने रौप्यपदकाची कमाई केली. तर त्याआगोदर मलेशियाला झालेल्या स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून दिले. राष्ट्रीय स्पर्धेत 2014 ते 2017 साली सलग तीन वेळा सुवर्णपदक तिने पटकाविले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा आणि राज्यपातळीवरही तिने आपली कामगिरी नंबर एकचीच ठेवली आहे. 

कुस्ती क्षेत्रात दोन आंतरराष्ट्रीय आणि पाच राष्ट्रीय कुस्त्यांची मैदाने गाजविलेल्या वडील शंकर कंधारे यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्रेया गेली सात वर्षापासून योगासनामध्ये आपली कर्तबगारी गाजवित आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व खेळाडू चंद्रकांत पांगारे हे तिला पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत योगासनाचे तंत्रशुद्ध धडे शिकवितात. तिच्या यशाची बातमी ऐकून आईवडील आणि भावाच्या डोळ्यात आऩंदाश्रू तरारले. 

माझ्या मुलीने योगा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून मुळशीचे आणि भारताचे नाव जगात चमकविले याचाच आनंद मोठा आहे. आतापर्यंत तिच्यासाठी केलेल्या कष्टाचे तिने चीज केले. यापुढील जागतिक स्पर्धेत खेळून तिने देशाचा तिरंगा फडकवत ठेवावा हीच आमची अपेक्षा आहे. 
नंदा आणि शंकर कंधारे (श्रेयाचे आईवडील)


​ ​

संबंधित बातम्या