शुभम जाधव, दुर्गाप्रसाद दासरीसह रेश्‍मा मानेला शिवछत्रपती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 February 2019

शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे बुधवारी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. यामध्ये शुभम बाजीराव जाधव (वुशू), दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी (शरीरसौष्ठव), रेश्‍मा अनिल माने (कुस्ती) यांना शिवछत्रपती पुरस्कार; तर स्वरूप महावीर उन्हाळकर (नेमबाजी) याला एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) घोषित झाला.

कोल्हापूर - शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे बुधवारी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. यामध्ये शुभम बाजीराव जाधव (वुशू), दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी (शरीरसौष्ठव), रेश्‍मा अनिल माने (कुस्ती) यांना शिवछत्रपती पुरस्कार; तर स्वरूप महावीर उन्हाळकर (नेमबाजी) याला एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) घोषित झाला.

आनंदाचा क्षण

दुर्गाप्रसाद दासरी म्हणाला, ‘‘शरीरसौष्ठवमध्ये करीअर करायचे ठरविले होते. मी २००५ पासून सुरवात केली. बिभीषण पाटील व्यायामशाळेशी २००८ मध्ये जोडला गेलो. गुरु विजय मोरे, बिभीषण पाटील यांचे मोठे मार्गदर्शन आहे. व्यायाम कसा करावा, तयारी कशी करावी, याचे तंत्र या दोघांकडून मिळाले. 
वर्षानंतर कनिष्ठ राज्य स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मला हुरूप आला. वरिष्ठ गटात २०११ मध्ये सुवर्णपदक मिळविले.

दोन्ही स्पर्धांत मला मोस्ट इंप्रुव्हड्‌चे गुण मिळाले. गडमुडशिंगी माझे गाव. वडील सत्यनारायण, आई सौ. पुष्पा, दोन बहिणी, माझा मुलगा विनोद, मुलगी पल्लवी, पत्नी सौ. हेमा यांनी खूप प्रोत्साहन दिले. मी २०१६-१७ मध्ये उपभारतश्री स्पर्धेत सहभागी झालो. मला नुकत्याच झालेल्या डायमंड कप वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळाले. विशेष म्हणजे, पश्‍चिम महाराष्ट्रातून अशी कामगिरी करणारा मी पहिला शरीरसौष्ठवपटू आहे. परिवाराने मला खूप साथ दिली. डॉ. संजय मोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. सचिन चांदेकर, सागर शेळके, राहुल परीट या मित्रांची साथही महत्त्वाची आहे.’’ 

सरावाने घडले करीअर
आर. के. नगर येथील स्वरूप उन्हाळकर म्हणाले, ‘‘मला दिव्यांग खेळाडूचा एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार नेमबाजीत मिळाला. सध्या मी शहाजी कॉलेजमध्ये बी. ए. करतो आहे. दुधाळी रेंजमधून मी नेमबाजी प्रशिक्षणाला सुरवात केली. सकाळी दोन तास, संध्याकाळी दोन तास सराव करतो. आतापर्यंत मी सहा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतून यश मिळविले. सध्या बालेवाडी (पुणे) येथे नेमबाजीचा सराव सुरू आहे. प्रशिक्षक किरण खंडारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक युनियात्री लियास यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो. आई सविता उन्हाळकर, भाऊ ओंकार यांचे सतत प्रोत्साहन असते. सध्या मी दुबईत नेमबाजी स्पर्धेसाठी आलो आहे.’’

आईवडिलांचे पाठबळ मोलाचे
शुभम जाधव म्हणाले, ‘‘माझे बाचणी गाव. मी बी. ए. पूर्ण केले. २०१२ मध्ये वुशु खेळाला सुरवात केली. हा पहिलाच पुरस्कार मला मिळाला, याचा मला खूप आनंद आहे. वुशु खेळाची मला आवड होती. त्यामुळे त्यात करीअरचा निर्णय घेतला. प्रशिक्षक नामदेव पाडेकर, बाजीराव कळंत्रे, अविनाश पाटील, एस. एस. कटके यांचे मार्गदर्शन आहे.

सकाळी तीन तास, संध्याकाळी तीन तास या पद्धतीने सराव करतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मला वुशुत करीअर करायचे आहे. दोन फेब्रुवारीला मी महाराष्ट्र पोलिस दलात भरती झालो.

गावामध्ये राहूनही करीअर करता येते, हे मी सिद्ध केले. चिकाटी, जिद्द, अविरत श्रम करण्याची तयारी असली, की यश तुमचेच असते. वडील बाजीराव, आई सौ. सुवर्णा यांचे पाठबळ मोलाचे आहे. बाचणीत विनामूल्य कुस्ती, कबड्डी, भरतीपूर्व प्राथमिक परीक्षा, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन घेतले जाते. यातून खेळाडू घडतात. याचा फायदा निश्‍चितच होतो.’’

वडणगे (ता. करवीर) - शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यावर येथील कुस्तीपटू रेश्‍मा माने हिचे पेढा भरवून कौतुक करताना आजी रत्नाबाई. शेजारी आजोबा राजाराम, आई कल्पना, वडील अनिल, चुलते भीमराव, वहिनी संजीवनी, भाऊ सचिन, युवराज, ऋषीकेश, बहीण नम्रता.

वडणगेत रेश्‍माच्या घरी आनंदोत्सव
वडणगे : शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यानंतर येथील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्‍मा माने हिच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पुरस्काराची माहिती समजेल तशी तिला शुभेच्छा देण्यासाठी घरी गर्दी झाली. 

गावातील जत्रेच्या फडात कुस्त्या जिंकणारी रेश्‍मा आज आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवत आहे. ऐपत नसतानाही तिच्या सरावात खंड पडू नये, यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला घरातच आखाडा बांधून दिला. सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या अनेक घरांत मुलींना दुय्यम वागणूक मिळत असताना, वडणगेसारख्या खेडेगावात एक कुटुंब मुलीला कुस्तीपटू बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. रेश्‍माचा जन्म शेतकरी कुटुंबातला. आई-वडील शेतकरी. मुला-मुलींना कुस्ती शिकवायची हे मानेंचे ध्येय. या ध्येयातूनच रेश्‍माची जडणघडण होत गेली. 

सहाव्या वर्षापासून रेश्‍मा कुस्तीशी जोडली गेली. आठव्या वर्षी तिने प्रत्यक्ष कुस्तीत पदार्पण केले. यानंतर, पदके जिंकण्याचा तिने सपाटाच सुरू केला, तो आजतागायत सुरू आहे. तिने अनेक स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मैदानांत विविध पदके पटकावली आहेत. 

आई- वडिलांबरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचेही मार्गदर्शन मिळाले. पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध साधण्याचे ध्येय आहे.
- रेश्‍मा माने,
कुस्तीपटू


​ ​

संबंधित बातम्या