मैत्रेयी गोगटे, ऐश्‍वर्या सावंतला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 February 2019

रत्नागिरी - आपल्या पराक्रमाने राज्यातील क्रीडा क्षेत्रात तेजाळलेल्या रत्नागिरीच्या सुकन्या कॅरमपटू मैत्रेयी गोगटे आणि खो-खोपटू ऐश्‍वर्या सावंत यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला.

रत्नागिरी - आपल्या पराक्रमाने राज्यातील क्रीडा क्षेत्रात तेजाळलेल्या रत्नागिरीच्या सुकन्या कॅरमपटू मैत्रेयी गोगटे आणि खो-खोपटू ऐश्‍वर्या सावंत यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. गेल्या एक तपापासून खुल्या गटात स्पर्धा करत मैत्रेयीने कॅरममध्ये राज्य पातळीवर विजेतेपद पटकावण्यापर्यंत मजल मारली, तर ऐश्‍वर्या सावंतने खो-खोच्या मैदानावर आपल्या संघाला राष्ट्रीय पातळीवर विजय मिळवून दिला. रत्नागिरीतीलच दोघा महिला खेळाडूंना असा पुरस्कार मिळण्याची जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासातील ही पहिली घटना आहे.

२०१७-१८ चे पुरस्कार आज जाहीर झाले. ऐश्‍वर्या ही आंतरराष्ट्रीय खो-खोपटू असून, इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने देशाचे नेतृत्व केले आहे. आईचे छत्र हरपले असताना गरीब परिस्थितीशी सामना करत तिने हे यश मिळवले. यापूर्वी तिला जानकी आणि राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिने खो-खोचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. शिर्के हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असताना तिने अनेक स्पर्धेत सहभाग घेतला.

पायकामधून तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रथम राज्य संघात निवड झाली होती. आतापर्यंत तिने १५ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्यासह संदीप तावडे, विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

कॅरमपटू मैत्रेयी गोगटे हिनेसुद्धा कॅरममध्ये अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. राज्य स्पर्धा आणि यूथ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने विजेतेपदाचा बहुमान पटकावला. तिला विनोद मयेकर, मिलिंद साप्ते यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल तिचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी अरुण केदार, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी अभिनंदन केले.


​ ​

संबंधित बातम्या