जागतिक मैदानी स्पर्धा - पत्नीपाठोपाठ पतीलाही रौप्यपदक

नरेश शेळके
Friday, 4 October 2019

- जागतिक मैदानी स्पर्धेत सातव्या दिवशी महिलांची चारशे मीटर शर्यत  बहरीनची सल्वा नासेर हिने जबरदस्त धाव घेत जिंकली

- शॉन युबाे हिला 400 मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर अर्ध्या तासाने ितचा पती मायकेल युबो यालाही डेकॅथलॉनमध्ये रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. 

-  भारताच्या जॉन्सन, ताजींदरपालकडून अपेक्षाभंग 

दोहा -  येथील खलिफा स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत सातव्या दिवशी महिलांची चारशे मीटर शर्यत आकर्षणाचे केंद्र होती. बहरीनची सल्वा नासेर विरुद्ध रिओ ऑलिंपिक विजेती बहामाची शॉन मिलर युबो यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस होती. मात्र, सल्वाने जबरदस्त धाव घेत सुवर्णपदक जिंकले आणि या शर्यतीत सर्वांत कमी वयाची (21 वर्षे 133 दिवस) सुवर्णपदक विजेती म्हणून मान मिळविला. 
शेवटच्या साठ मीटरमध्ये उंचापुऱ्या शॉनने सल्वाला गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी उशीर झाला आणि सल्वाने नोंदविलेली 48.14 सेकंद ही वेळ या शर्यतीतील सर्वकालीन तिसरी वेगवान ठरली. शॉनला 48.37 सेकंदात रौप्यपदक मिळाले. रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या जमैकाच्या शेरिका जॅकसनच्या खात्यावर आणखी एक ब्रॉंझपदक जमा झाले. विशेष म्हणजे स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सहा धावपटूंनी 50 सेकंदांच्या आत शर्यत पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी लंडन येथे रौप्यपदक जिंकणाऱ्या सल्वाची वेळ आता आशियाई विक्रम म्हणून गणली जाईल. या पराभवामुळे जागतिक युवा, ज्युनिअर, ऑलिंपिक सुवर्णपदकानंतर विश्वविजेतेपद मिळविण्याचे शॉन मिलरचे स्वप्न भंग पावले. शॉनच्या शर्यतीनंतर 35 मिनिटांनी तिचा पती मायकेल युबोची डेकथलॉनमधील शेवटची पंधराशे मीटरची शर्यत होती. त्यात त्याला किमान दुसरे स्थान मिळविणे गरजेचे होते. मात्र, त्याची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आणि तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दोघे ऑगस्ट 2017 मध्ये विवाहबद्ध झाले होते. युबोची शर्यत संपल्यावर दोघांनी आपल्या देशाचे ध्वज घेऊन स्टेडियमला एकत्र फेरी मारली. डेकॅथलॉनमध्ये जर्मनीच्या निकोलस कोलने सुवर्णपदक जिंकून सर्वांत कमी वयाचा विश्वविजेता म्हणून आपली नोंद केली. 
दरम्यान, महिला हेप्टथलॉनमध्ये चौथ्यांदा सहभागी होणाऱ्या ग्रेट ब्रिटनच्या कॅटरीना जॉन्सन-थॉम्पसनने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. यामुळे ग्रेट ब्रिटनला 2015 च्या स्पर्धेनंतर पुन्हा सुवर्ण जिंकता आले. त्या वेळी जेसिका इनिस-हिलने सुवर्ण जिंकले होते. महिला गोळाफेकीत चीनच्या लिजाव गॉंगने आपले सुवर्णपदक कायम राखले. 

जॉन्सन, ताजींदरपालकडून अपेक्षाभंग 

पुरुषांच्या पंधराशे मीटर शर्यतीत भारताच्या आशा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जिन्सॉन जॉन्सनवर होत्या. कारण यंदाच्या मोसमात त्याने दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. प्राथमिक फेरीच्या शर्यतीत तो शेवटचे दोनशे मीटर शिल्लक असेपर्यंत आघाडीच्या जथ्यात होता. नंतर त्याची दमछाक झाली आणि तो दहाव्या स्थानावर फेकला गेला. त्याने 3 मिनिटे 39.86 सेकंद अशी संथ वेळ नोंदवली. सहा महिन्यांपूर्वी येथे आशियाई विजेतेपद मिळविणाऱ्या ताजींदरपाल सिंग तूर यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. पात्रता फेरीत तो 20.43 मीटर अशीच सर्वोत्तम फेक करू शकला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्याला 20.90 मीटरच्या वर फेक करायची होती. त्यामुळे त्याचेही आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. 

निकाल ः पुरुष - डेकॅथलॉन - निकालस कौल (जर्मनी, 8691 गुण), मायकेल युबो (इस्टोनिया, 8604 गुण), डॅमियन वार्नर (कॅनडा, 8529 गुण), महिला - गोळाफेक - लिजाव गॉंग (चीन, 19.55 मीटर), डॅनियल डॉड (जमैका, 19.47 मीटर), ख्रिस्तीना श्‍चावान्तीझ (जर्मनी, 19.17 मीटर), चारशे मीटर - सल्वा नासेर (बहरीन, 48.14 सेकंद), शॉन मिलर-युबो (बहामा, 48.37 सेकंद), शेरिका जॅकसन (जमैका, 49.47 सेकंद), हेप्टथलॉन - कॅटरीना जॉन्सन-थॉम्पसन (ग्रेट ब्रिटन, 6981 गुण), नफीसातो थिअम (बेल्जियम, 6677 गुण), वेरेना प्रिनर (ऑस्ट्रिया, 6560 गुण). 
--- 
मिश्र रिले केल्यानंतर चारशे मीटरमध्ये फक्त सर्वोत्तम कामगिरी करायची हाच विचार केला होता. मात्र, सुवर्णपदक जिंकल्यानंतर या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. आज खूप आनंदी आहे. 
- सल्वा नासेर, चारशे मीटरची सुवर्णपदक विजेती 
--- 
यंदा आम्ही दोघांनी खूप मेहनत केली. त्यामुळे दोघांनी पदक जिंकल्याचा आनंद तर आहेच. मात्र, पती मायकेलने रौप्यपदक जिंकल्याचा मला अधिक आनंद आहे. 
- शॉन मिलर युबो, चारशे मीटरची रौप्यपदक विजेती 
 


​ ​

संबंधित बातम्या