सचिनवर तोंडसुख घेण्यापूर्वी आफ्रिदी ही आकडेवारी एकदा पहाच..

संजय घारपुरे
Thursday, 9 July 2020

सचिनने 2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेत शोएबच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. सचिन शतकाकडे भक्कम वाटचाल करीत असताना अख्तरने त्याची ही वाटचाल रोखली होती.  

कराचीः प्रसिद्धीत राहणे शाहीद आफ्रिदीला कायम आवडते. आता त्याने प्रसिद्धीत राहण्यासाठी सचिन तेंडुलकरलाच लक्ष्य केले आहे. सचिन हा शोएब अख्तरच्या वेगवान गोलंदाजीस घाबरत होता, असा दावा आता त्याने केला आहे. आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी भारतीय संघांविरुद्ध एकतर्फी वर्चस्व राखले होते, त्या वेळी भारतीय संघ माफी मागत असे, असे तारे तोडले होते. आता आफ्रिदीने पुन्हा एकदा सचिन अख्तरला घाबरत होता, असा दावा केला आहे. आपल्या आत्मचरित्रातही त्याने हाच दावा केला होता आणि त्या वेळी अख्तरने त्याच्याशी सहमती दाखवली होती.

आफ्रिदीला नेमकं काय झालय? सचिनसंदर्भात पुन्हा एकदा बरळला

मी अख्तरला घाबरत होतो, असे सचिन कधीच मान्य करणार नाही. अख्तरचे काही स्पेल चांगलेच भयावह असत. त्यामुळे सचिनच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम फलंदाजांची भंबेरी उडत असे. मिड-ऑफ अथवा कव्हरला क्षेत्ररक्षण करताना हे अनुभवले आहे. त्या वेळी फलंदाजाची देहबोली पाहून तो दडपणाखाली आहे हे लक्षात येत असे, असा दावा आफ्रिदीने केला आहे.
सचिन शोएबसमोर कायम घाबरून खेळला, असे मला म्हणायचे नाही. पण शोएबच्या काही स्पेलनी फलंदाजांना हादरवले होते. सचिनने 2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेत शोएबच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. सचिन शतकाकडे भक्कम वाटचाल करीत असताना अख्तरने त्याची ही वाटचाल रोखली होती.  

सचिनची पाकविरुद्धची कामगिरी
- 18 कसोटीत 42.28 च्या सरासरीने 1,057 धावा, त्यात दोन शतके, सर्वोत्तम नाबाद 194
- 69 एकदिवसीय सामन्यात 40.09 च्या सरासरीने 2,526 धावा, त्यात पाच शतके. सर्वोत्तम 141
अख्तर असताना
- 9 कसोटीत 41.60 च्या सरासरीने 416 धावा, त्यात एक शतक  सर्वोत्तम नाबाद 194
- 19 एकदिवसीय सामन्यात 45.47 च्या सरासरीने 864 धावा. त्यात एक शतक. सर्वोत्तम 141

क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हेही लक्षवेधक
- अख्तरचा सामना करताना सचिनच्या 41.60 च्या सरासरीने 416 धावा
- अख्तरने 19 एकदिवसीय सामन्यात सचिनला पाचदा बाद केले
- दोघेही खेळलेल्या 9 कसोटीत अख्तरने सचिनला तीनदा टिपले होते


​ ​

संबंधित बातम्या