EngvsPak : तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाक पराभवाच्या छायेत 

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

मालिकेत पराभवापासून वाचण्यासाठी पाकिस्तानला या तिसऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीला पाकिस्तान संघावर पराभवाचे ढग दाटून आले आहेत.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात साउथहॅम्पटनच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात काल रविवारी तिसऱ्या दिवशी पाक  कर्णधार अझर अलीने एकाकी झुंज दिली. परंतु पाकिस्तानचा संघ 273 धावांत सर्वबाद झाल्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघाला इंग्लंडविरूद्ध फॉलोऑन खेळावे लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ या सामन्यात संकटात सापडला आहे. सध्याच्या स्थितीला पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 1 बाद 78 धावा केल्या आहेत. सलामीवीर अबिद अली 40 आणि कर्णधार अझहर अली 13 धावांवर खेळत आहेत.     

लुकाकूच्या आत्मघाती गोलमुळे युरोपा लीगमध्ये सेविलाची खिताबावर मोहर   

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघातील आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मोहम्मद रिझवानच्या (53) धावांच्या साथीने अझर अलीने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. जेम्स अँडरसनने नसीम शाहच्या रुपात डावातील पाचवा बळी टिपत पाहुण्या पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांत आटोपला. अझर अलीने 272 चेंडूत 21 चौकाराच्या मदतीने 141 धावांची नाबाद खेळी केली. 

त्यापूर्वी इंग्लंडच्या संघाने पहिला फलंदाजी करताना, 8 गड्यांच्या बदल्यात 583 धावांवर पहिला डाव घोषित केला. इंग्लंडच्या जॅक क्रॉली आणि बटलर यांनी मिळून केलेल्या 359 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला 583 धावांचा डोंगर उभा करणे शक्य झाले. त्यानंतर  583 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शान मसूदला जेम्स अँडरसनने अवघ्या 4 धावांवर चालते केले. अबीद अली 1 धाव करुन तंबूत परतला. पहिला गडी गमावल्यानंतर मैदानात उतरलेला कर्णधार अझर अलीने शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. बाबर आझम (11), असद शफीक (5), फवाद आलम (21), मोहम्मद रिझवान (53), यासिर शाह (20), शाहीन आफ्रीदी (3), मोहम्मद अब्बास (1) तर नशीम शाहला खातेही उघडता आले नाही.   

इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक 5 बळी मिळवले. स्टुअर्ट ब्रॉडने 2, क्रिस वोक्स आणि डॉमिनिक बेसने प्रत्येकी एक-एक विकेट घेत जिमीला उत्तम साथ दिली. तिसऱ्या दिवशीच्या खेळात पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला आहे. 310 धावांची पिछाडी भरुन काढून सामना आपल्या बाजूने वळवणे किंवा अनिर्णित ठेवणे पाकिस्तानी संघासाठी मोठे आव्हान असणार आहे. मात्र चौथ्या दिवशीचा काही वेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे इंग्लंडला उद्याच्या म्हणजे पाचव्या दिवशीच्या खेळात पाकिस्तानच्या उर्वरित फलंदाजांना लवकर बाद करावे लागणार आहे. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑगस्ट रोजी मँचेस्टर येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत पहिला सामना जिंकला होता. पाकिस्तानला या कसोटीत मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथील दुसरा कसोटी सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे या मालिकेत पराभवापासून वाचण्यासाठी पाकिस्तानला या तिसऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीला पाकिस्तान संघावर पराभवाचे ढग दाटून आले आहेत. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या