अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा गडहिंग्लजला गुरुवारपासून
एक नजर
- गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा
- 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा.
- एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि महाराष्ट्रातील 36 संघांचा सहभाग.
- तेरा, पंधरा आणि अठरा वर्षांखालील गटात स्पर्धा
- एकुण एक लाख रुपयांची बक्षिसे.
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि महाराष्ट्रातील 36 संघ सहभागी होणार आहेत. तेरा, पंधरा आणि अठरा वर्षांखालील गटात स्पर्धा होत असून एकुण एक लाख रुपयांची बक्षिसे आहेत.
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. लिग कम नाकआऊट पद्धतीने ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटासाठी दोन दिवस स्पर्धा असुन रोज सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात सामने आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख दहा हजार, उपविजेत्यांना आठ तर उपांत्य फेरीतील संघाना तीन हजार रुपयांचे पारितोषिक आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धावीर, गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक आणि आघाडीपटू अशी वैयक्तिक बक्षिसे आहेत. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंला सामनावीर तर पराभूत संघातील चांगल्या खेळाडूला लढवय्या म्हणून बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहा राज्यातील संघानी प्रवेश निश्चित केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, मिरज, डेरवण संघाचा सहभाग आहे. सहभागी खेळाडूंची भोजन आणि निवासाची सोय संयोजकांनी केली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मैदान, निवास, भोजन, उद्घाटन, पारितोषिक, वितरण, अर्थ, प्रसिद्धी यांचा यात समावेश आहे. युनायटेडचे अध्यक्ष संभाजीराव शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेसकर, संत गजानन शिक्षण समुहाचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण आणि सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
युवा खेळाडूंना प्रोत्साहन
आयपीएल क्रिकेट धर्तीवर सहा वर्षे जीपीएल स्पर्धेनंतर गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा सुरू झाली. तेरा, पंधरा आणि अठरा वर्षांखालील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक फुटबॉल संघटना (फिफा) आणि भारतीय फुटबॉल महासंघाच्या सुचना आहेत. युवा खेळाडूंना खेळण्याची अधिक संधी मिळावी हाच या स्पर्धेचा उदेश आहे.