स्त्री-पुरुष भेदाला 'किक' कधी बसणार? 

मुकुंद पोतदार
Saturday, 15 September 2018

बागानचे अध्यक्ष स्वपन साधन बोस यांना अपार आनंद झाला. काय बोलू, काय नको असे झाले आणि मग नको तेच ते बोलले. ते म्हणाले की, सात मुलींच्या पाठीवर मुलगा व्हावा तसा आनंद झाला! 

"लोक काय म्हणतील?' असा प्रश्‍न स्वतःलाच विचारत कुढत बसून बाऊ करण्याशिवाय अनाठायी, अनावश्‍यक, अकारण, आकस्मिक तुलना करणे ही सुद्धा काही भारतीयांची "कमजोरी-कम-बिमारी' आहे. (उगाच) तुलना करणाऱ्यांचा एक गट आहे आणि लोक काय म्हणतील असे (उगी-उगी) वाटणाऱ्यांचाही गट आहे. यात फरक असा की अकारण तुलना करणारे आपण बोलल्यावर काय परिणाम होईल याचा विचार न करता थेट बोलून मोकळे होतात! तुलना करणाऱ्यांच्यात अनेक प्रकार आहेत. यातील काही मंडळींचा निकष म्हणजे स्त्री-पुरुष भेद करणे. फुटबॉलमध्ये हे नुकतेच घडले. "भारतीय फुटबॉलची पंढरी' असा लौकिक असलेल्या कोलकत्यात मोहन बागान आणि ईस्ट बंगाल हे प्रमुख संघ आहेत. यातील बागानने कोलकता फुटबॉल लीगचे (सीएफएल) विजेतेपद नक्की केले. या संघाने आठ वर्षांच्या खंडानंतर हे यश मिळाले. एक फेरी बाकी असतानाच बागानने विजयी आघाडी घेतली. त्यामुळे बागानचे अध्यक्ष स्वपन साधन बोस यांना अपार आनंद झाला. काय बोलू, काय नको असे झाले आणि मग नको तेच ते बोलले. ते म्हणाले की, सात मुलींच्या पाठीवर मुलगा व्हावा तसा आनंद झाला! 

swapan sadhan bose

खरे तर आपल्या संघातील खेळाडूंची पाठ थोपटण्यासाठी त्यांना यापेक्षा चांगले नक्कीच बोलता आले असते, पण तुलना करण्याच्या प्रयत्नात ते चुकले. नंतर त्यांना माफी सुद्धा मागावी लागली. आनंद उतूच जात होता तर त्यांनी 2009 नंतर प्रथमच असे यश मिळविलेल्या बागानच्या खेळाडूंना भरघोस बक्षीस जाहीर करायला हवे होते. सामन्याच्या मध्यंतराच्या ब्रेकमध्ये थेट प्रक्षेपण करून त्यांची प्रतिक्रिया ऐकविण्यात आली. 

ते बंगालीत म्हणाले की, सात बोच्चोर ढोरे मेये होच्चीलो, होथ्थाथ एकता छेले होयीछे. की रोकोम लागे भाई तोमार होले, शेरोम लागछे 

सलग सात वर्षे मुली झाल्या आणि मग अचानक मुलगा झाला...तर तुला कसे वाटेल बंधू...या क्षणी मला तसेच वाटतेय... बोस हे "टुटू' हा टोपणनावाने लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे ते राज्यसभेचे खासदार होते. मला असे म्हणायचे नव्हते. कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, अशी सारवासारव करीत त्यांनी लाडक्‍या व्यक्तींना या शब्दांमुळे दुःख झाले म्हणून माफी मागत असल्याची औपचारिकता पार पाडली. पुढे जाऊन ते म्हणाले की, माझ्या घरात सुना आहेत. मला एक नात आहे. मुलगी असण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. मुलगा-मुलीत फरक आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही. त्यामुळे मी हे शब्द मागे घेतो. विचारवंतांची भूमी... 

वास्तविक बंगाल ही रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद अशा महान विचारवंतांची भूमी आहे. याशिवाय फुटबॉलप्रेमासाठीही कोलकात्याची ओळख आहे. अशावेळी बोस यांचे वक्तव्य धक्कादायक ठरते. 

खरे तर रिओ ऑलिंपिकमध्ये अनेक मातब्बर संभाव्य विजेत्यांची पीछेहाट होत असताना कुस्तीपटू साक्षी मलिकने ब्रॉंझ, तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळविले. त्याआधी लंडन ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनपटू साईना नेहवाल आणि बॉक्‍सर मेरी कोम यांनी ब्रॉंझपदके मिळविली. प्रामुख्याने साक्षी-सिंधूचे यश गाजले. 

खेळच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत "अबला नव्हे सबला' ही उक्‍ती सप्रमाण सिद्ध होत आहे. त्यातही खेळात साईना-सिंधूशिवाय टेनिसपटू सानिया मिर्झा, स्क्वॅशपटू जोश्‍ना चिनाप्पा-दीपिका पल्लीकल, टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा यांनी कामगिरीचे मापदंड उंचावले आहेत. या मुलींची कामगिरी साऱ्या देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

अशावेळी एका सांघिक खेळातील राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीची तुलना करण्यासाठी बोस यांनी स्त्री-पुरुष भेदाचा आधार घेणे आणखी धक्कादायक ठरते. खरे तर या भेदाला पहिली "किक' घालायची असेल तर ती सुरवात खेळाच्या मैदानावरून व्हायला हवी. आपल्या देशाच्या लेकी हे करून दाखवीत असताना इतरांच्या लेखी मात्र स्त्री-पुरुष भेद हाच निर्णायक निकष राहणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. 


​ ​

संबंधित बातम्या