मॅंचेस्टर सिटीचे चेल्सीविरुद्ध अर्धा डझन गोल

वृत्तसंस्था
Monday, 11 February 2019

या विजयाने मॅंचेस्टर सिटीने गोलफरकाच्या आधारे लिव्हरपूलला मागे टाकून आघाडी घेतली आहे. त्याचवेळी टॉटेनहॅम हॉट्‌स्पूर संघाने लिसेस्टरचा 3-1 असा पराभव करून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत विजेतेपदाच्या आपल्या आशाही पल्लवित ठेवल्या.

लंडन : मॅंचेस्टर सिटी संघाने चेल्सीचा 6-0 असा धुव्वा उडवून इंग्लिश प्रिमियर लीग मधील आपल्या विजेतेपदाच्या आशा भक्कम केल्या. अर्जेंटिनाचा व्यावसायिक खेळाडू सर्गीओ ऍग्युएरो याने हॅटट्रिक नोंदवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 

या विजयाने मॅंचेस्टर सिटीने गोलफरकाच्या आधारे लिव्हरपूलला मागे टाकून आघाडी घेतली आहे. त्याचवेळी टॉटेनहॅम हॉट्‌स्पूर संघाने लिसेस्टरचा 3-1 असा पराभव करून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत विजेतेपदाच्या आपल्या आशाही पल्लवित ठेवल्या. 

मॅंचेस्टर सिटीची सुरवातच धमाकेदार होती. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला रहिम स्टर्लिंगने त्यांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सहा मिनिटाच्या अंतरात सर्गीओ ऍग्युएरो याने दोन गोल केले. पूर्वार्धात गुंडोगन याने गोल करून विश्रांतीलाच संघाला 4-0 शी ाघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात ऍग्युएरो याने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावली आणि अखेरच्या टप्प्यात स्टर्लिंगने आणखी एक गोल करून संघाचा मोठा विजय मिळविला. 

मौरिन्हो पॉचेटिनो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टॉटेनहॅमने सॅंचेझच्या हेडरने पूर्वार्धात खाते उघडले. त्यानंतर जेमी वार्डी याला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्याने लिसेस्टर संघावर दडपण आले. उत्तरार्धात ख्रिस्तियन एरिक्‍सन आणि सॉन हेउंग मिन याने गोल करून टॉटेनहॅमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी 76व्या मिनिटाला जेमी वॉर्डीने एक गोल केल्याचे समाधान लिसेस्टरला लाभले. गेल्या सहा सामन्यातील त्यांचा हा पाचवा विजय ठरला. 

या विजयानंतर आता आघाडीवर असणाऱ्या लिव्हरपूर आणि मॅंचेस्टर सिटी यांच्यापेक्षा टॉटेनहॅम पाच गुणांनी मागे आहेत. टॉटेनहॅमला 1961 नंतर अजून एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. हॅरी केन आणि डेल अली यांच्याशिवाय खेळताना त्यांनी केलेली कामगिरी नक्कीच त्यांना चॅंपियन्स लीगसाठी आत्मविश्‍वास निर्माण करणारी आहे. चॅंपियन्स लीगच्या बाद फेरीत बुधवारी (ता. 13) ते बोरुसिया डॉर्टमुंडशी खेळणार आहेत. 

लिसेस्टरचा हा पाच सामन्यातील चौथा पराभव होता. प्रशिक्षक क्‍लाऊडी प्योल यांच्यावरील दडपण या पराभवाने वाढले आहे. प्रशिक्षकांना त्यांच्या संघातील वरिष्ठ खेळाडूंचीच साथ मिळत नसल्याचे वृत्त आहे.
 

संबंधित बातम्या