सेरेनाचे अशोभनीय अखिलाडूवृत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन

मुकुंद पोतदार
Sunday, 9 September 2018

वक्तव्य : याद राख, वेळ आली तर हा (फुल्या-फुल्या) चेंडू मी तुझ्या (फुल्या-फुल्या) नरड्यात कोंबेन (..आणि गळा घोटून तुझा जीव घेईन)

कालावधी : सप्टेंबर 2009

विधानानुसार कथित गुन्हेगार : लाईनमन महिला

वक्तव्य : तू चोरटा आहेस. तु माझी माफी मागितली पाहिजेस. कधी मागतोयस माझी माफी...(फुल्या-फुल्या...)

विधानानुसार कथित गुन्हेगार : चेअर अंपायर

कालावधी : सप्टेंबर 2018

दोन्ही विधाने केलेली व्यक्ती : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स

वक्तव्य : याद राख, वेळ आली तर हा (फुल्या-फुल्या) चेंडू मी तुझ्या (फुल्या-फुल्या) नरड्यात कोंबेन (..आणि गळा घोटून तुझा जीव घेईन)

कालावधी : सप्टेंबर 2009

विधानानुसार कथित गुन्हेगार : लाईनमन महिला

वक्तव्य : तू चोरटा आहेस. तु माझी माफी मागितली पाहिजेस. कधी मागतोयस माझी माफी...(फुल्या-फुल्या...)

विधानानुसार कथित गुन्हेगार : चेअर अंपायर

कालावधी : सप्टेंबर 2018

दोन्ही विधाने केलेली व्यक्ती : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स

प्रसंग घडला ते ठिकाण : टेनिसच्या मोसमातील अखेरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचे संयोजन होते त्या न्यूयॉर्कमधील फ्लशिंग मेडोजवरील आर्थर अॅश स्टेडियम

अमेरिकेची जगप्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने नऊ वर्षांच्या अंतराने केलेली ही दोन विधाने आहेत. यातील अलिकडच्या वक्तव्याला अनेक संदर्भ आणि वैविध्यपूर्ण अशी पार्श्वभूमी आहे. आधी नऊ आकड्यानेच सुरवात करूयात. सेरेनाने गेल्या वर्षी ऑलिंपिया नामक मुलीला जन्म दिला. नऊ महिन्यांनंतर डिलिव्हरी झाली त्यानंतर दुर्धर असा आजार झाला. मुळात प्रसुतीच्यावेळी एकवेळ जीव धोक्यात आला होता, असे तिने अलिकडेच सांगितले. सेरेनाने त्यानंतर विलक्षण जिद्दीने पुनरागमन केले. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून ती सुपरमॉम बनणार का याची सर्वांना प्रतिक्षा होती. विंबल्डनमध्ये तिने अंतिम फेरी गाठली, पण जर्मनीच्या अँजेलिक केर्बरकडून ती हरली. मग मायदेशातील ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिला सर्वोत्तम संधी होती, पण जपानच्या नाओमी ओसाका हिच्याकडून ती हरली. महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची सेरेनाला संधी आहे, पण तिची प्रतिक्षा लांबली.

खरे तर महिला टेनिस म्हणजे सेरेनाचा वन वुमन शो असे म्हणता येईल इतकी विलक्षण कामगिरी तिने केली आहे, पण पराभव समोर दिसताच काही वेळा तिचा तोल ढळतो. त्यातून तिची एकाग्रता आणि पोलादी इच्छाशक्ती भंग पावते. ती अखिलाडूवृत्तीचे अशोभनीय प्रदर्शन घडविते. अमेरिकन ओपनमध्ये ती नेहमीच हॉट फेव्हरीट अन् होम फेव्हरीट असते. अशावेळी येथे तिने असे करणे धक्कादायक ठरते.

 

सेरेनाने अंतिम सामन्यादरम्यान प्रशिक्षक पॅट्रीक मौरातोग्लोऊ यांच्याकडून कोचींग घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला संहिताभंगाची (कोड व्हॉयलेशन) पहिली ताकिद देण्यात आली. चेअर अम्पायर कार्लोस रॅमोस यांनी ही कारवाई केली. हे पहिल्या सेटमध्ये घडले. सेरेनाने हा सेट गमावला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये 2-3 अशा स्थितीस तिने रॅकेट फेकून दिली. त्याबद्दल तिला पुन्हा ताकिद मिळाली व एका गुणाचा दंड झाला. त्यामुळे सेरेना संतापली. तिने चेअर अंपायरपाकडे धाव घेत त्यांना चोर (thief) असे संबोधले. हा गेम झाल्यानंतर तिने पंचांना उद्देशून बडबड सुरुच ठेवली. तू खोटारडा आहेस. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत माझा सामना असलेल्या कोर्टवर तू कदापी दिसणार नाहीस. तू माझी माफी कधी मागणार आहेस, म्हण सॉरी म्हण...

हे घडल्यानंतर रॅमोस यांनी तिला एका गेमचा दंड केला. 3-4 अशा पिछाडीवरून ती 3-5 अशी मागे पडली. नंतर तिने खेळण्यास नकार दिला. त्यावेळी एकच गदारोळ माजला. सेरेनाने टुर्नामेंट रेफ्री ब्रायन एर्ली, ग्रँड स्लॅम सुपरव्हायजर डॉना केल्सो यांच्याशीही हुज्जत घातली. तेव्हा ती तावातावाने बोलत होती. अखेर सेरेना खेळण्यास तयार झाली. तिने लव्हने सर्व्हिस राखली, पण मग ओसाकाने सर्व्हिस राखत विजय साकार केला.

सेरेनाने नंतर कोचिंग घेतल्याचा आरोप फेटाळून लावला, पण पॅट्रीक यांनी कोचींग देत होतो हे मान्य केले. त्याचवेळी सेरेनाचे माझ्याकडे लक्ष नव्हते, असे शेपूटही त्यांनी जोडले. त्याहीपुढे जाऊन नाओमीला सुद्धा तिचे प्रशिक्षक कोचिंग देत होते, सगळेच जण असे करतात, असा जावईशोधही त्यांनी लावला.

या स्पर्धेत सेरेनाकडून असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2009 मध्ये सेरेनानाची बेल्जियच्या किम क्लायस्टर्सशी लढत होती. तो उपांत्य सामना होता. किम मुलीला जन्म दिल्यानंतर कमबॅक करीत होती. सेरेनाविरुद्ध तिने जिद्दीने खेळ केला. सेरेना पिछाडीवर होती. ती सर्व्हिस करीत असताना लाईनमन महिलेने फुट फॉल्ट झाल्याचा इशारा केला. त्यामुळे सेरेना भडकली आणि तिने हे वक्तव्य केले. लाईनमन महिलेने तातडीने मुख्य पंचांना याची कल्पना दिली. मग मुख्य पंच ल्युसी इंगझेल यांनी स्पर्धेचे टुर्नामेंट रेफ्री ब्रायन एर्ली यांना कोर्टवर बोलावून घेतले. सेरेनाला मग आणखी गुणाचा दंड करण्यात आला. सेरेना 4-6, 5-6 व 15-30 अशी पिछाडीवर होती. पहिल्यांदा एका गुणाचा दंड झाला तेव्हा किमला मॅचपॉईंट मिळाला, तर दुसऱ्यांदा दंड झाल्यामुळे किमचा विजय नक्की झाला. या लढतीचा इतका वाईट शेवट होणे किमसाठी अन्यायकारक ठरले, पण सेरेनासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठीच नव्हे तर महिला टेनिस आणि एकूणच या खेळासाठी धक्कादायक ठरले. 

खरे तर हे दोन प्रसंग पाहिल्यास एक चॅम्पियन म्हणून सेरेनाच्या प्रतिमेला तडा जातो. तिने मार्गारेट कोर्ट यांचा विश्वविक्रम मोडला की नाही हा निकष तिचे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी निर्णायक असणार नाही. सेरेना आणि तिची थोरली बहिण व्हिनस यांनी सार्वजनिक कोर्टवर टेनिसचे धडे गिरविले. वडील तसेच प्रशिक्षक रिचर्ड यांनी या भगिनींना मार्गदर्शन केले. दोघींनी अतुलनीय कामगिरी केली. त्यातही सेरेनाची कारकिर्द सनसनाटी आहे.

ज्या नाओमीने ही स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले तिच्या यशाला सेरेनामुळे गालबोट लागले. नाओमीच्या पहिल्या यशाचा अध्याय लिहीला जाईल त्यावेळी याचा उल्लेख अपरिहार्य ठरेल. खरे तर नाओमीचा जन्म 1997चा, तर सेरेनाने 1999 मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. नाओमी जपानी असली तरी ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. सेरेनाचा ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम सामन्यांतील खेळ पाहात ती प्रेरीत झाली. आपल्या आयडॉलविरुद्धच हा क्षण साकार होणे तिच्यासाठी स्वप्नाच्याही पलिकडचे होते. सेरेनाकडे नाओमीसारख्या अनेक मुली आणि इतकेच नव्हे तर इतर खेळांमधील क्रीडापटू आणि जाणकार क्रीडाप्रेमी सुद्धा रोलमॉडेल म्हणून पाहतात. 

सेरेना मातृत्वानंतर जिंकली तर तिला सुपरमॉम हे बिरूद सार्थ ठरेल आणि ते व्हावे म्हणून जगभरातील मिडीया सज्ज झाला होता. अशावेळी सेरेनाने असे अशोभनीय अखिलाडूवृत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे टीकास्पद ठरते.


​ ​

संबंधित बातम्या