राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत " एसईएमएस' ला अजिंक्‍यपद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकुलात नुकतीच ही स्पर्धा झाली. स्पर्धेत 
" एसईएमएस' ला मुलींच्या गटात मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सातारा ः राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या (एसईएमएस) मुलांच्या संघाने विजेतेपद, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले.

 
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर व शंकरराव मोहिते- पाटील इंग्लिश स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकुल येथे नुकत्याच या स्पर्धा झाल्या.
 
या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात एसईएमएसने अंतिम सामन्यात पुणे संघाचा 51-24 असा तब्बल 27 गुणांनी पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सत्रापासून एसईएमएस संघाने आक्रमक खेळ केला. मध्यंतरास एसईएमएसकडे 20- 08 अशी 12 गुणांची आघाडी होती.

त्यानंतर कुणाल शिराळे, ध्रूव निकम, उदय भोसले, अथर्व परदेशी व वैभव कोकरे यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर एसईएमएसने हा सामना 51- 24 असा तब्बल 27 गुणांनी जिंकला.

मुलींच्या गटात चुरशीच्या झालेल्या सामन्यात एसईएमएस संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघास पुणे विभागाकडून 46- 43 असा तीन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या मध्यंतरास सातारा संघाकडे तीन गुणांची आघाडी होती; परंतु पुणे संघातील खेळाडूंनी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत अखेरच्या दोन मिनिटांत सातारा संघावर तीन गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत पुण्याने सामना 46-43 असा तीन गुणांनी जिंकला.

या सामन्यात एसईएमएसच्या इफा इनामदार, ईश्वरी कुंभार, सिद्धी शिंदे, श्रावणी बादापुरे, निसर्गा सपकाळ, श्रेया त्रिंबके यांनी अखेरच्या मिनिटापर्यंत दिलेली झुंज प्रेक्षकांच्या मनात ठसून राहिली.
 
यशस्वितांना राष्ट्रीय खेळाडू रोहन गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. सौरभ शर्मा व जिज्ञासा गुजर यांनी त्यांना सहकार्य केले. यशस्वितांचे संस्थेच्या अध्यक्षा अर्निका गुजर- पाटील, मुख्याध्यापिका मिथिला गुजर यांनी अभिनंदन केले.


​ ​

संबंधित बातम्या