ENGvsWI 2nd Test : पहिल्या दिवसा अखेर इंग्लंड मजबूत स्थितीत 

टीम ई-सकाळ
Friday, 17 July 2020

इंग्लंडने पहिल्या दिवशीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 3 विकेट गमावत, 207 धावसंख्या केली आहे.                

मँचेस्टर : कोरोनाच्या महामारीनंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विंडीज संघाने मोठा विजय मिळवला. त्यानंतर मँचेस्टर येथे इंग्लंड-विंडीज यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेसन होल्डरचा हा निर्णय सध्यातरी वेस्ट इंडीज संघाला महागात पडल्याचे चित्र मैदानावर पहायला मिळत आहे. कारण इंग्लंडने पहिल्या दिवशीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 3 बाद 207 धावा केल्या आहेत. 

महेंद्र सिंग धोनी हा शांत व संयमी खेळाडू - मायकल हसी         

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विंडीज संघाने, साउथहॅम्प्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघाला धूळ चारत विजय मिळवला होता. त्यानंतर आज पासून इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात दुसरा सामना सुरु झाला आहे. पावसाच्या आगमनामुळे हा सामना देखील सुरु होण्यासाठी विलंब झाला. परंतु त्यानंतर वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर वेस्ट इंडीज संघाच्या रोस्टन चेसने कर्णधार जेसन होल्डरचा निर्णय बरोबर ठरवत, आपल्या धारदार गोलंदाजीवर रोरी बर्न्स आणि जॅक क्रॉलीला माघारी धाडले. 

इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स 15 धावांवर पायचीत झाला. तर जॅक क्रॉली देखील रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरकडे झेल देत शून्यावर बाद झाला. सलामीवीर डॉम सिब्लेने मैदानावर पाय रोवत कर्णधार जो रूट सोबत संघाचा डाव सावरला. तर 23 धावांवर अल्झारी जोसेफने जो रूट ची विकेट घेतली. यानंतर आलेल्या बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ले या दोघांनी 126 धावांची भागीदारी करत इंग्लंड संघाला पडझडीपासून रोखले. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा डॉम सिब्लेने 253 चेंडूंचा सामना करत 86 धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्स 159 चेंडूत 59 धावांवर खेळत आहे. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 3 गड्यांच्या मोबदल्यात 207 धावसंख्या उभारली आहे.                       

'हे' क्रिकेटपटू कसोटीत कधीच शून्यावर बाद झाले नाहीत

दुसरा कसोटी सामना जिंकून वेस्ट इंडीज संघाला  इंग्लंडमध्ये 32 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. यापूर्वी 1988 मध्ये विंडीज संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4 - 0 ने हरवले होते. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ 157 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांपैकी 49 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर 57 सामन्यांत इंग्लंड पराभव पत्करावा लागला आहे. त्याचवेळी इंग्लंड संघाने घरातील विंडीजविरुद्धच्या झालेल्या 87 सामन्यांपैकी 34 सामने जिंकले आहेत. तर 31 सामने इंग्लंड संघाने गमावले आहेत. आणि 22 सामने अनिर्णित राहिले आहेत.

 


​ ​

संबंधित बातम्या