सर्फराज म्हणतो, दोघांची तयारी केली अन् तिसराच...

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने केदार जाधवचा सामना करण्याची तयारी केली नसल्याचे मान्य करत फलंदाजांच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. 

दुबई : आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत पाकिस्तानवरील आपले वर्चस्व कायम राखले. सामन्यानंतर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने केदार जाधवचा सामना करण्याची तयारी केली नसल्याचे मान्य करत फलंदाजांच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. 

''आमच्या फलंदाजांनी भारताच्या दोन प्रमुख फिरकी गोलंदाजांना सामना करण्याची चांगली तयारी केली होती. मात्र, तिसऱ्याच फिरकी गोलंदाजाने येऊन आमच्या फलंदाजांना चकवले. आम्ही केदार जाधवला खेळण्याची तयारी केली नव्हती,'' अशा खंत सर्फराजने व्यक्त केली. 

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे दोघेही भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ आहेत. मात्र कालच्या सामन्यात केदार जाधवने महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना बाद केले.  केदारला हवेत फटका मारण्याच्या प्रयत्नात सर्फराज फार लवकर बाद झाला. त्यानंतर असीफ अली आणि शादाब खानला केदार जाधवची फिरकी कळालीच नाही आणि ते दोघेही बाद झाले. 

भारताविरुद्धचा पराभव ही संघासाठी धोक्याची घंटा असून यापुढे चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त कोले. तो म्हणाला, ''पहिल्या पाच षटकांतच आमचे सलामीवीर बाद झाले. त्यानंतर बाबर आझमचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजांचा मैदानावर टिकाव लागला नाही.''

संबंधित बातम्या